पलूसमध्ये विषप्राशन केलेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

SHARE:

पलूसमध्ये विषप्राशन केलेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पलूस शहरातील संजय तात्यासो पाटील (वय ४६) आणि त्यांच्या पत्नी मनिषा संजय पाटील (वय ४२) यांनी २ सप्टेंबर रोजी विषप्राशन केले होते. त्यांच्यावर सांगली व मिरज येथील रुग्णालयांत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी (६ सप्टेंबर) दोघांचाही मृत्यू झाल्याची नोंद पलूस पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे पलूस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा पाटील यांनी २ सप्टेंबर रोजी विषप्राशन केल्यानंतर त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, पलूस येथे दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. तेथे ५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला होता.

मात्र, घरी गेल्यानंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने नातेवाइकांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारास ग्रामीण रुग्णालय, पलूस येथे दाखल केले. त्यानंतर प्रकृतीची स्थिती लक्षात घेऊन रविवारी सकाळी त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सकाळी सुमारे ११ वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे ११.१० वाजता घोषित करण्यात आले.

दरम्यान, संजय पाटील यांनिही २ सप्टेंबर रोजी विषप्राशन केल्यानंतर ग्रामीण रुग्णालय, पलूस येथून सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

६ सप्टेंबर रोजी सकाळी घरी असताना संजय पाटील यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यामुळे नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये सकाळी सुमारे ११ वाजता दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

या दोन्ही घटनांबाबत पलूस पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेहांच्या शवविच्छेदनाबाबत पोलिसांनी तजवीज ठेवली असून, घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोळे करीत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण व इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *