rajarambapu patil : लोकनेते राजारामबापू पाटील : समाजकारण, सहकार आणि लोकशाही मूल्यांचा आदर्श

SHARE:

rajarambapu patil : लोकनेते राजारामबापू पाटील : समाजकारण, सहकार आणि लोकशाही मूल्यांचा आदर्श : लोकनेते राजारामबापू पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे नेतृत्व होते. सामान्य माणसाच्या प्रश्नांशी स्वतःला जोडून घेणारे, त्यांच्या दुःखात सहभागी होणारे आणि न्यायासाठी अखंड लढणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक व दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे ध्येय होते.

बापूंनी सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले. सहकारी साखर कारखाना, दूध संघ, सुतगिरण, बँक, बझार, पाणीपुरवठा संस्था उभारून त्यांनी शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य दिले. शेतीला पाणी मिळावे, उत्पादन वाढावे आणि शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या सहकारी संस्थांमुळे हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला गेला.

राजकारणात असूनही त्यांनी सत्तेला कधीच अंतिम महत्त्व दिले नाही. आमदार, मंत्री, पक्षनेते अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमी समाजकारणाला प्राधान्य दिले. पदयात्रा, आंदोलने आणि थेट लोकसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी नाळ घट्ट जोडली. हजारो किलोमीटरच्या पदयात्रांद्वारे त्यांनी जनतेच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. ही लोकाभिमुख कार्यपद्धतीच त्यांना ‘लोकनेते’ बनवते.

शिक्षण क्षेत्रातही राजारामबापूंचे योगदान अतुलनीय आहे. ग्रामीण व वंचित भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्था स्थापन केल्या. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या ठाम विश्वासातून त्यांनी ही चळवळ उभी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे असंख्य विद्यार्थी घडले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाले.

राजारामबापूंचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे प्रतीक होते. पांढरे कपडे, साधी राहणी आणि हसतमुख स्वभाव ही त्यांची ओळख होती. सत्तेच्या चढ-उतारांमध्येही त्यांनी कधी आपली मूल्ये सोडली नाहीत. लोकशाही, सहकार, सामाजिक न्याय आणि मानवी संवेदनशीलता हीच त्यांच्या विचारांची पायाभरणी होती.

बापूंनी रुजवलेल्या विचारांच्या आणि मूल्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव मा. आमदार जयंतराव पाटील साहेब आणि त्यांचे नातू मा. प्रतिक दादा पाटील हेही समाजकारण, सहकार आणि लोकाभिमुख राजकारणाची परंपरा अत्यंत निष्ठेने पुढे नेत आहेत. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा वारसा जपताना त्यांनी सामाजिक न्याय, शेतकरी हित, युवक सशक्तीकरण आणि विकासाभिमुख धोरणांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाशी थेट संवाद, संवेदनशील नेतृत्व आणि मूल्याधिष्ठित कार्यपद्धती यांमुळे त्यांनी बापूंच्या आदर्शांना समकालीन संदर्भात अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूप दिले आहे. त्यामुळे बापूंनी उभारलेली लोककल्याणाची चळवळ आजही नव्या पिढीत तितक्याच ताकदीने पुढे जात असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

आज राजारामबापू आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, कार्य आणि आदर्श आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय इतिहासात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. आशा या लोकनेत्याच्या स्मृर्तीस विनम्र अभिवादन !

– प्राचार्य आर. डी. सावंत
सचिव, कासेगाव एज्युकेशन सोसायटी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *