SANGLI LOKSABHA : आघाडी तुटली तरी चालेल पण सांगलीत काँग्रेस लढणारच…

SHARE:

जनप्रवास । सांगली
वेळप्रसंगी आघाडी तुटली तरी चालेल, पण सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणारच असा निर्धार जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेसच्या या पावित्र्याने शिवसेनेच्या उमेदवारीवर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेल्या पै. चंद्रहार पवार यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. विशाल पाटील आणि पै.चंद्रहार पाटील मैदानात उतरले तर त्याचा फायदा भाजपचे संजय पाटील यांनाच होणार असल्याने अशा परिस्थितीत शिवसेना माघार घेते का? याकडे राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

SANGLI LOKSABHA : आघाडी तुटली तरी चालेल पण सांगलीत काँग्रेस लढणारच…

प्रचाराला लागा; काँग्रेस वरिष्ठांचे कार्यकर्त्यांना आदेश

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्या तुलनेत शिवसेनेची ताकद पाहता खानापूर मतदारसंघातून शिवसेना निवडून आली, आता तेथील कार्यकर्ते व नेते शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. मिरजेत थोडी फार ताकद होती, पण तीदेखील शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाकडे गेलेली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांना 8976 आत मते पडली होती. ‘

नोटा’ ला शिवसेनेपेक्षा अधिक मते पडली होती. आता फुटीनंतरही ठाकरे गटाची (उबाठा) ताकद नसताना देखील सांगलीच्या जागेसाठी हट्ट धरला जात असल्यामुळे राजकीय निरिक्षक संभ्रमात पडले आहेत. शिवसेनेच्या या अडवणुकीमुळेच जिल्ह्यातील तसेच राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच सांगली लोकसभेची जागा कदापी सोडणार नाही, प्रसंगी आघाडी तुटली तरी चालेल पण सांगली लढणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला असून वरिष्ठ नेत्यांकडून प्रचाराला लागा, अशा सूचना देखील विशाल पाटील यांना दिल्याचे वृत्त आहे.

कोल्हापुरची शिवसेनेची जागा काँग्रेसला सोडल्यानंतर सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला दिली असल्याचा दावा सेनेकडून केला जात आहे.

त्यानुसार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश घेऊन त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे. मात्र याला काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांगली लोकसभेची जागा काँग्रेसचीच आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढणार असल्याचे त्यांना सांगितले. शिवाय या मतदासंघात शिवसेनेची ताकद काय? असा सवाल देखील केला होता. तर वेळ पडली तर टोकाची भूमीका घेऊ, असा इशारा देखील आ. कदम यांनी दिला होता.

सांगलीत आमचे विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहेत.

नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला येत आहे. तसे अजून काही ठरलेले नाही. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. सांगलीबाबत चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला दिला ही खोटी बातमी आहे. सांगलीत आमचे विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहेत. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावर मंगळवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाना पटोलेंना संयमाने बोलले पाहिजे, असा खोचक सल्ला दिला .

सांगलीची जागा शंभर टक्के ठाकरे गटाला दिली आहे.

नाना पटोले हे काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी संयमाने भूमीका घेतली पाहिजे, असे संजय राऊत यांनी नांदेड दौर्‍यात म्हटले आहे. सांगलीची जागा शंभर टक्के ठाकरे गटाला दिली आहे. तिकडे कुणाला अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. असे सांगून त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देखील फेटाळला आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले.

सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील उभे राहिले तर त्यांना किती मते पडतील? ते खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात सक्षमपणे लढू शकतील का? असे अनेक सवाल काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेच्या राजहट्टामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सावळागोंधळ निर्माण झाला आहे.

पुन्हा दादा व बापू वाद?

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी व शिवसेना (उबाठा) यांची महाविकास आघाडी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे जिल्ह्यातील आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे आहे. या मतदारसंघात कुणाची ताकद किती आहे, भाजप विरोधात कोणता उमेदवार चालू शकतो, याची त्यांना माहिती आहे. पण ते यावर मौन बाळगून आहेत , त्यामुळे राजकीय गोटातून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांना दादा घराण्यातील उमेदवार नको आहे काय? दादा-बापू वाद पुन्हा जिल्ह्यात उफाळणार का? असा सवाल जाणकार मंडळींमधून केला जात आहे.

आ. विश्वजीत कदम ठाम…

शेंडी तुटो वा पारंबी अशा वृत्तीतून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे, यावर माजी मंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम मात्र ठाम आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा दुसर्‍या पक्षाने मागणे चुकीचे आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. या उलट शिवसेनेची ताकद कमी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणार नाही. काँग्रेसच लढणार आहे. तशी तयारी देखील पूर्ण झाली असल्याचे आ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या प्रदेश व केंद्रीय नेत्यांना सांगितले आहे.
———————————————

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *