– योगेश स्वामी
tasgaon elephant news : तासगावच्या गौरी हत्तीवर वनताराचा डोळा! : सांगली जिल्ह्यातील तासगाव – धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनात्मक वारशाचा जीवंत प्रतीक असलेली गौरी हत्ती – सध्या एका गंभीर संकटाच्या सावटाखाली आहे. श्रीमंत परंपरेचा अभिमान असलेल्या तासगांव गणपती संस्थानच्या या लाडक्या हत्तीवर आता अनंत अंबानी यांच्या खासगी वनतारा प्रकल्पाचा डोळा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
tasgaon elephant news : तासगावच्या गौरी हत्तीवर वनताराचा डोळा!
नांदणी मठातील माधुरी हत्तीचा ‘वनतारा’ प्रकल्पात प्रवेश
सध्या ‘नांदणी मठातील’ माधुरी नावाची हत्ती वनतारा प्रकल्पाच्या भव्य जंगलात नेण्यात आली आहे. हा प्रकल्प जवळपास तीन हजार एकरांवर पसरलेले खासगी अभयारण्य आहे, जिथे देशभरातील दुर्मिळ प्राणी एकत्र आणले जात आहेत. माधुरी हत्ती प्रशिक्षित असल्यामुळे तिची निवड झाली, परंतु या हलवणीत तिच्यावर अन्याय झाला, अशी ओरड समाजातून उठू लागली आहे.
वनताराने याआधी केरळमधील एका प्रशिक्षित हत्तीला घेण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र केरळ प्रशासनाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतरच लक्ष नांदणी मठाकडे वळले आणि पेटाचा डाव खेळून माधुरी हत्तीला तिथून हलवण्यात आले.
आता लक्ष तासगांवच्या गौरीकडे?
नांदणीच्या घटनेनंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे – तासगांवच्या गौरी हत्तीवर देखील वनताराचे लक्ष होते!
गौरी हत्ती ही केवळ एक प्राणी नसून तासगांव तालुक्याचा आत्मा, श्रद्धा आणि अस्मितेचे प्रतीक आहे.
गौरी हत्ती अर्धशिक्षित असली तरीही ती भाविकांना आशीर्वाद देते, बाजारपेठांमधून मोकळेपणाने फिरते, आणि रथोत्सवात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथाच्या पुढे डौलात चालताना संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेते.
तिची देखभाल कौटुंबिक जबाबदारीप्रमाणे केली जाते. तिला मिळणारी दक्षिणा महुदांकडे दिली जाते आणि फळे ती स्वतः खाऊन समाधान मानते. गौरी म्हणजे तासगांवकरांची जिव्हाळ्याची देवी!
जनतेने सावध होणे आवश्यक
वनतारा प्रकल्पाच्या नजरा आता शेडबाळ, कुंथुगिरी, वरूड, कुंजवन या इतर संस्थानांतील हत्तींवरही वळल्या आहेत. पण गौरीवर लक्ष असणे हे तासगांवकरांसाठी विशेष धोक्याचे आहे.
संस्थानचे दिवाणजी यांनी सध्या कोणतेही पत्र संस्थानला आलेले नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी भविष्यात यासंदर्भात काही घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गणपती संस्थान, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तासगांव तालुक्यातील जनतेने आता सतर्क आणि सावध भूमिका घेणे अत्यावश्यक झाले आहे. भावनांशी खेळणार्या निर्णयांना थांबवायचे असेल, तर एकजुटीने आवाज उठवण्याची हीच वेळ आहे.
गौरी ही हत्ती नाही, ती आमच्या श्रद्धेची मूर्त स्वरूप आहे. तिच्यावर कोणाचाही डोळा सहन केला जाणार नाही! – अशा शब्दांत तासगांवकरांनी आपली भावना व्यक्त केली असून, भविष्यात जनआंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











