vita election news : विटा पालिकेची निवडणूक होणार रंगतदार

SHARE:

vita election news : विटा पालिकेची निवडणूक होणार रंगतदार : उत्कंठा लागून राहिलेल्या विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून नगराध्यक्षपदी ओबीसी महिला विराजमान होणार आहे. नव्याने निघालेल्या कुणबी दाखल्यामुळे विट्यात राजकीय लढत रंगतदार होणार असे निश्चित झाले आहे. विटा शहरावर देवांग समाजाचा असणारा पगडा पाहता या निवडणुकीत आणखीन रंग भरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

vita election news : विटा पालिकेची निवडणूक होणार रंगतदार

तब्बल 29 वर्षानंतर ओबीसी महिलेला नगराध्यक्ष पदाची संधी ; आगामी निवडणूक होणार चुरशीची

50 हजार मतदानाकडे वाटचाल करणार्‍या विटा नगरपालिकेची आगामी निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट आहे. गेल्या 50 वर्षापासून विटा नगरपालिकेवर असणारी पाटील घराण्याची एकहात्ती सत्ता आणि शहरात बाबर गटाला मिळालेले मताधिक्य यामुळे ती लढत तुल्यबळ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडून देवता अनिल बाबर यांना शब्द दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा अविनाश चोथे याही प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. तर माजी सभापती वैशाली प्रताप सुतार, माजी सभापती लता बाळासाहेब मेटकरी, माजी नगरसेविका नेहा किशोर डोंबे याही इच्छुक आहेत.

तर बाबर गटाकडून विद्या वैभव म्हेत्रे, उत्तमराव चोथे यांच्या स्नूषा दिपाली अविनाश चोथे, काजल संजय म्हेत्रे, माजी नगरसेविका रुपाली मंथन मेटकरी, माजी नगरसेवक शिवाजी हारगुडे यांच्या स्नूषा भावना प्रणव हारगुडे यांची नावे चर्चेत आहेत. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून ऐनवेळी बाबर गटाकडून तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, असे बाबर गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

सन 1996 मध्ये विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी ओबीसी महिला प्रवर्गातून भागीरथी टेके यांनी नगराध्यक्ष बहुमान भूषवला होता. त्यानंतर तब्बल 29 वर्षानंतर ओबीसी महिलेला विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची संधी मिळत आहे. दरम्यान नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण खुले आरक्षण पडले असते तर वैभव पाटील विरुद्ध अमोल बाबर, सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असते तर प्रतिभा पाटील विरुद्ध शितल बाबर आणि अनुसुचित जातीचे आरक्षण पडले असते तर प्रशांत कांबळे विरुद्ध संजय भिंगारदेवे अशा लढतीची चर्चा सुरू होती.

त्यातच भाजपचे नेते अनिलआप्पा बाबर यांची ओबीसी पुरुष गटातून प्रमुख दावेदारी मानले जात होते. परंतु अनपेक्षितरित्या महिला ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले आहे. आज विटा शहरात खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी कुणबी दाखले काढून ओबीसीत समाविष्ट झाल्याचे चर्चा सुरू होती. त्यामुळे नव्याने ओबीसीत समाविष्ट झालेल्या काही वजनदार उमेदवारांची उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही. विटा शहरातील देवांग समाजाचे प्राबल्य आणि मतदारसंख्या लक्षात घेता त्यांना डावलणे तितके सोपे नाही. एकूणच महिला ओबीसी आरक्षणामुळे अपेक्षित धरलेली समीकरणे झपाट्याने बदललेली आहेत. परंतु यंदाची विटा नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात तीळमात्र शंका नाही.

नवीन चेहरे आणि नवा डाव

गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर होऊन ‘ओबीसी महिला’ आरक्षण घोषित झालं आहे. त्यामुळे आता ही आगामी विटा नगरपालिकेची निवडणूक काहींसाठी राजकारणातील अस्तित्व निर्माण करणारी, तर काहींसाठी अस्तित्व संपवणारी ठरणार आहे. अनेकांचा अपेक्षाभंग, नाराजी आणि नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक विटयाच्या राजकारणाला नवं वळण देणारी ठरणारी आहे. नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार्‍या महिला उमेदवारांसाठी ही राजकारणात स्वतःचं वेगळ स्थान निर्माण करण्याची वेळ आहे, तर दीर्घकाळ नेतृत्व करत आलेल्या पुरुष नेत्यांसाठी ही परीक्षा टिकून राहण्याची असेल. त्यामुळे विटयाच्या राजकारणात आता नवी चुरस, नवीन चेहरे आणि नवे राजकीय डाव रंगणार आहेत.

ओबीसी फॅक्टर

विटा शहराची एकूण मतदारसंख्या 50 हजाराच्या आसपास आहे. यामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यानंतर देवांग समाजाचे 10 ते 12 हजाराच्या आसपास मतदारसंख्या आहे. अनुसूचित जातीची मतदारसंख्या 6 हजार ते 6 हजार 500 इतकी आहे. मुस्लिम समाजाची मतदारसंख्या 4 ते 4 हजार 500 तर धनगर समाजाची मतदारसंख्या 2 हजार ते 2 हजार 500 तर लिंगायत समाजाची मतदारसंख्या 2 हजार ते 2 हजार 500 दरम्यान आहे. तसेच रामोशी समाज आणि वडार समाजाची मतदारसंख्या देखील निर्णायक ठरणारी आहे.

नाभिक समाजही यंदा प्रथमच राजकीय पटलावर आपल्या हक्काची दावेदारी मागत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि गटांना मात्र विट्यातल्या एकूणच राजकारण आणि समाजकारणावर ओबीसी समाजाचा मोठा पगडा आहे. त्यामुळे यंदाच्या विटा नगरपालिका निवडणुकीत ओबीसी फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे. नगराध्यक्ष पदाचे ओबीसी महिला आरक्षण पडल्यामुळे ओबीसी समाजाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणत्या समाजाला मिळणार ? याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *