vita election news : सदाभाऊ नेमकं कुणाला देणार नगराध्यक्षपदाची संधी ? : गेल्या अनेक दिवसांपासून विटा नगरपालिकेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणार्या इच्छुकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस लागली आहे. गेल्या 55 वर्षापासून विटा नगरपालिकेची सत्ता अबाधित ठेवणारे पाटील गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील हे नेमकं नगराध्यक्षपदाचे तिकीट कोणाला देणार ? अशी चर्चा विटा शहरासह परिसरात रंगली आहे. पाटील गटाकडून विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली असून नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
vita election news : सदाभाऊ नेमकं कुणाला देणार नगराध्यक्षपदाची संधी ?
प्रतिभा चोथे, ज्योती रोकडे, लता मेटकरी यांचेच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल ;
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यापासून विटा शहरात अनेकांनी आपल्या उमेदवारीची दावेदारी केली आहे. मूळचे भारतीय जनता पार्टीत असणारे माजी नगरसेवक अनिलआप्पा बाबर यांच्या पत्नी देवता बाबर या पार्टीतून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. अनिलआप्पा बाबर यांनी तशी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली आहे.
अनिलआप्पा बाबर हे तसे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहेत. युवा नेते माजी नगराध्यक्ष अँड. वैभव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यापूर्वी अनिलआप्पा बाबर हे बाबर गटात सक्रिय होते. परंतु वैभव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नेहमी बाबर गटाच्या बरोबर दिसणार्या अनिलआप्पा बाबर यांनी देखील भाजपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
मात्र विटा नगरपालिकेत ओबीसी आरक्षण पडल्यानंतर अनिलआप्पा बाबर यांनी आम्हालाच नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी, अशी मागणी पाटील गटाकडे केली. त्या अनुषंगाने त्यांनी विटा शहरात तयारी देखील सुरू केली. मात्र माजी सभापती वैशाली प्रताप सुतार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पाटील गटाचे सर्वेसर्वा सदाशिवराव पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान पाटील गटाकडून माजी सभापती लता सुरेश मेटकरी, माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा अविनाश चोथे, माजी सभापती वैशाली प्रताप सुतार आणि देवता अनिल बाबर यांची नावे चर्चेत होती.
उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र भाजपकडून आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा अविनाश चोथे, ज्योती माधव रोकडे आणि लता सुरेश मेटकरी या तिघींचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर आज देवता बाबर यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे अनिलआप्पा बाबर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज आणखी कुणाचा दाखल होणार ? याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. सत्ताधारी पाटील गटात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक जास्त असल्याने मोठी चुरस आहे. त्यामुळे विटा शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चोथे, ज्योती रोकडे, लता मेटकरी आणि देवता बाबर यांची संभाव्य उमेदवार म्हणून नावे चर्चेत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या असून याबाबतचा अंतिम निर्णय हा पाटील गटाचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव पाटील हेच घेणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात. कुणाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











