rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सेनेला जागा सोडली तरी काँग्रेस लढणारच, नेत्यांचा श्रेष्ठींना इशारा

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI LOKSABHA : सेनेला जागा सोडली तरी काँग्रेस लढणारच, नेत्यांचा श्रेष्ठींना इशारा :  महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन शनिवारीही खल सुरुच राहिला. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या जागेचा तिढा कायम आहे. सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सोडली नाही तरी काँग्रेस सांगली लढणारच, असा इशारा जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांना दिला. त्यामुळे सोमवारी सांगलीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

SANGLI LOKSABHA : सेनेला जागा सोडली तरी काँग्रेस लढणारच, नेत्यांचा श्रेष्ठींना इशारा

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बातमी बाहेर आली. त्यात शिवसेनेला 22 जागा दाखवण्यात आल्या आणि सांगली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेतली. जिल्ह्यात काँग्रेस 17 वेळा लोकसभा जिंकली आहे. 2014 ला मोदी लाटेत पराभव झाला, 2019 ला ही जागा सोडावी लागली. सांगली काँग्रेस मजबूत आहे आणि यावेळी परिस्थिती विजयासाठी अनुकुल आहे. केवळ कुणाच्यातरी हट्टासाठी सांगली पणाला लावू नका, असा आग्रही धरला. प्रदेश काँग्रेसने आम्हाला मान्यता द्यावी, आम्ही मैत्रीपूर्ण लढतीला तयार आहोत, असेही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट सांगितले.

मुंबईत आ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी एकत्र येत काँग्रेस एकजुटीचा नारा दिला. सांगलीत काँग्रेसला माघार घेणे परवडणारे नाही. लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकीवरही त्याचा विपरित परिणाम होईल. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला अखेरची विनंती करावी, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत, असा स्पष्ट संदेश दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध सेना असा ताण वाढला आहे.

खर्गेंची भेट, पवारांची वेळ

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी रात्री उशीरा भेटीची वेळ दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटीसाठी सोमवारी सकाळची वेळ मिळाली आहे. या दोन नेत्यांकडेही सांगलीबाबत आग्रही भूमिका मांडली जाणार आहे.

तर मैत्रीपूर्ण लढतीला तयार – पृथ्वीराज पाटील

आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांना सांगलीबाबतचा अहवाल सादर केला. शिवसेना जागा सोडत नसेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढतीला तयार आहोत. ठाकरेसाहेब वसंतदादांच्या नातवाविरुद्ध उमेदवार उतरवणार असतील तर त्याचेही स्वागत करु, अशी भूमिका मांडल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

फोटो ओळी – मुंबईत काँगे्रसचे महासचिव के. सी. वेणुगोपालराव यांच्याशी चर्चा करताना आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज