rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीचा कल दुपारपर्यंत कल समजणार

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI LOKSABHA : सांगलीचा कल दुपारपर्यंत कल समजणार : सांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी आठ वाजता होत आहे. सरासरी 21 फेर्‍या होणार आहेत. मतमोजणीला अवघे 24 तास उरल्याने राजकीय पक्षांची घालमेल झाली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले असून उत्सुकता ताणली आहे. मंगळवारी सायंकाळीपर्यंत निकाल घोषित होईल, यासाठीही प्रशासनाकडून तयारी केली जात आहे, तर दुपार बारानंतर निकालाचा कल समजू शकतो. या मतमोजणीसाठी सुमारे सहाशे कर्मचारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

SANGLI LOKSABHA : सांगलीचा कल दुपारपर्यंत कल समजणार

लोकसभा उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे देव पाण्यात, उत्सुकता ताणली

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह 20 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तरी खरी लढत ही भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे बंडखारे व अपक्ष उमेदवार विशाल पाटील या दोन उमेदवारातच झाली, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु महाविकास आघाडीतील फुटीमुळे ठाकरे गटाची निवडणुकीत गोची झाल्याचे दिसून आले होते.

लोकसभा मतदारसंघातील 18 लाख 68 हजार 174 मतदारांपैकी 11 लाख 63 हजार 353 मतदारांनी मतदान केले.

9 लाख 53 हजार 24 पुरुष मतदारापैकी 6 लाख 22 हजार 54 जणांनी मतदानाचा हक्क बजावला तर 9 लाख 15 हजार 26 महिला मतदारापैकी 5 लाख 41 हजार 267 महिलांनी मतदान केले. 62.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मतदानानंतर ईव्हीएम मशीन मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसमधील गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी खडा पहारा आहे. पहिल्या गेटवर सीएपीएफ, दुसर्‍या गेटवर स्टेट आर्म पोलिस फोर्स (एसएपीएफ) आणि गोदामाच्या गेटवर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे.

मतदान झाल्यानंतर तब्बल 26 दिवसांनंतर मतमोजणी होणार आहे.

मंगळवार (दि. 4) रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतमोजणीसाठी किती टेबल राहणार, किती आणि कर्मचारी असणार याचे पूर्ण नियोजन झालेले आहे, तर सांगली लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण मतमोजणी सरासरी 21 फेर्‍यात पूर्ण होणार आहेत. यासाठी सहाशे अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आले आहेत.

निकाल अवघ्या 24 तासांवर आला आहे.

शनिवारी विविध वृत्त वाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यामध्ये धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह अन्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले असून निकालाची उत्सुकता लागली आहे.

विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल

मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई यांची नियुक्ती केली आहे. पोस्टल मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी प्रत्येक टेबलवर एक सहाय्यक निवडणूक अधिकारी, एक सुपरवायझर, दोन सहायक व एक सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ईटीपीबीएस मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी दोन Aसहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज