kasbe digraj news : कसबे डिग्रज निवडणूक राजकीय ताकदीची आणि गटातटांच्या अंतिम कसोटीची! : कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघात यंदाची निवडणूक सोप्या गणिताची नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. चार मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल करताच मतदारसंघातील राजकीय वातावरण क्षणात तापले असून, ही लढत चुरशीची नाही तर अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची ठरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
kasbe digraj news : कसबे डिग्रज निवडणूक राजकीय ताकदीची आणि गटातटांच्या अंतिम कसोटीची!
अर्ज माघारीस अजून मुदत असली तरी, मैदानात उतरलेल्या नावांवरूनच समोरासमोरची फड बांधली गेल्याचे चित्र आहे. अर्ज माघारीनंतर काही समीकरणे बदलतीलही, पण सध्या तरी कसबे डिग्रजमध्ये राजकीय रणसंग्राम सुरू झाल्याचे चित्र आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला, पण यंदा नवी चाल!
काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) आघाडी झाल्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आणि खासदार विशाल पाटील यांनी पारंपरिक राजकारणाला छेद देत युवा उद्योजक प्रशांत अवधूत यांना थेट मैदानात उतरवले. तरुण चेहरा, मोठे नेटवर्क आणि संपूर्ण मतदारसंघात ओळख – काँग्रेसने यंदा नवा प्रयोग केला आहे.
अजित पवार गटाची जोरदार एन्ट्री
निवडणुकीत रंग भरत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचाही थेट प्रवेश झाला असून, मार्केट कमिटीचे माजी संचालक कुमार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मौजे डिग्रजला आजवर जिल्हा परिषदेत थेट संधी न मिळाल्याची खंत आता राजकीय मुद्दा बनत आहे. यंदा तरी आपला माणूस या भावनेचा फायदा कुमार पाटील यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपक्ष उमेदवारीतून बंडाचा इशारा
या निवडणुकीतील सर्वात खळबळजनक घडामोड म्हणजे अपक्ष उमेदवार स्वप्निल नलावडे. ज्येष्ठ नेते आनंदराव नलावडे यांनी यंदा निवडणूक लढवायचा चंग बांधला होता. मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने थेट मुलाला अपक्ष म्हणून मैदानात उतरवून त्यांनी राजकीय बंडखोरीचा स्पष्ट संदेश दिला आहे. माजी सरपंच असलेले स्वप्निल नलावडे कसबे डिग्रजमध्ये मजबूत गटाचे नेतृत्व करतात. त्यामुळे ही अपक्ष उमेदवारी केवळ नावापुरती नसून, ती मतांची सरळ कात्री ठरण्याची शक्यता आहे.
भाजपचा आत्मविश्वास, शेतकरी संघटनेचा वारसा
भाजपने हा मतदारसंघ जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडला असला तरी, प्रदीप पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून राजकारणाची सुरुवात केलेल्या प्रदीप पाटील यांनी अनेक आंदोलने गाजवली आहेत. अलीकडील नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांतील भाजपच्या यशामुळे पक्षात आत्मविश्वास ओसंडून वाहत आहे.
नांद्रे ठरणार ‘किंगमेकर’?
या लढतीतील निर्णायक गाव म्हणून नांद्रे पुढे येत आहे. नांद्रे गावातून यंदा शिवसेना शिंदे गटाकडून महावीर पाटील, रयत क्रांतीकडून रावसाहेब ऐतवडे, वंचित बहुजन आघाडीकडून राजू परीट आणि अपक्ष सतीश हेर्ले यांची उमेदवारी आहे. येथील मतदार कुणाच्या पाठीशी उभे राहणार, यावरच निकालाचे गणित ठरण्याची शक्यता आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून नांद्रे येथे झालेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे भाजपसाठी मोठे भांडवल ठरत आहेत.
मोठी नावे, पण स्थानिक राजकारण आघाडीवर
या मतदारसंघावर काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांचे वर्चस्व असले तरी, यंदा दिल्ली-मुंबईपेक्षा गावपातळीचे राजकारण अधिक निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. गटातट, वैयक्तिक प्रभाव आणि स्थानिक अस्मिता या सगळ्यांचा कस लागणार आहे.
निष्कर्ष स्पष्ट-
कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघातील ही निवडणूक
सोपी नाही
एकतर्फी नाही
निवडणूक आहे -प्रतिष्ठेची
राजकीय ताकदीची
आणि गटातटांच्या अंतिम कसोटीची!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











