bhose zp news : भोसे गटात राजकीय रणधुमाळी; तिरंगी लढतीची शक्यता स्पष्ट : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणार्या जिल्हा परिषद भोसे गटासह भोसे व सोनी या दोन पंचायत समिती गणांतील निवडणुकीचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून, या मतदारसंघात आता तिरंगी आणि चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
bhose zp news : भोसे गटात राजकीय रणधुमाळी; तिरंगी लढतीची शक्यता स्पष्ट
काँग्रेस पक्षाने अखेरच्या क्षणी आपले पत्ते उघडत जिल्हा परिषद भोसे गटासाठी बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. तर भोसे पंचायत समिती गणासाठी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन महावीर बस्तवडे आणि सोनी पंचायत समिती गणासाठी युवा व्यावसायिक गजानन माळी यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली.
दुसरीकडे, भाजपानेही या मतदारसंघात ताकदीने उडी घेत काँग्रेससमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
जिल्हा परिषद भोसे गटासाठी उद्योजक आशिष जाधव, तर भोसे पंचायत समिती गणासाठी मनोज पाटील आणि सोनी पंचायत समिती गणासाठी राजेंद्र माळी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, यामुळे लढतीचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
दरम्यान, काँग्रेसने निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न दिल्याने काही इच्छुकांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरीचा झेंडा फडकावला आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण पाटील यांनी जिल्हा परिषद गटासाठी बंडखोर उमेदवारी जाहीर केली असून, भोसे पंचायत समिती गणातून तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष वैभव चव्हाण यांनीही अपक्ष म्हणून मैदानात उतरत काँग्रेस व भाजपाला थेट आव्हान दिले आहे.
या मतदारसंघातील उमेदवारी निश्चितीसाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे तसेच माजी खासदार संजयकाका पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने संभ्रम कायम राहिला. अखेर आज सकाळी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा बैठक झाली. या बैठकीत दिनकर पाटील हे शरद पवार गटाकडून इच्छुक असतानाही काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर करत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याचे चित्र समोर आले.
भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापले उमेदवार जाहीर केल्याने आता या मतदारसंघातील निवडणुकीची राजकीय आखणी पूर्ण झाली असून, अपक्ष उमेदवार नेमका कोणाला धक्का देणार, कोणाचे गणित बिघडणार, याकडेच संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











