miraj panchyat news : अपहरणप्रकरणात शिंदेसेनेच्या मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्यावर गुन्हा दाखल.

SHARE:

miraj panchyat news : अपहरणप्रकरणात शिंदेसेनेच्या मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्यावर गुन्हा दाखल. : बुधगाव येथील पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिंदेसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख प्रा. मोहन वनखंडे (रा. मिरज) व अजित शेजूळ (रा. मालगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. सध्या अटकेत असलेल्या चौघांनी दिलेल्या जबाबानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणने पुरावे गोळा करण्यास प्रारंभ केला आहे.

miraj panchyat news : अपहरणप्रकरणात शिंदेसेनेच्या मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्यावर गुन्हा दाखल.

मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे सोमवारी दि. 9 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे निवडीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले. मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर रात्री अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांना प्रथम मिरजेत प्रा. वनखंडे यांच्या निवासस्थानाजवळ आणले.

तेथून सांगलीत सोडले. सांगली ग्रामीण पोलिसांशी त्यांनी तत्काळ संपर्क साधल्यानंतर पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदविला. इंगळे यांनी त्यांच्या जबाबात चौघांनी अपहरण करून त्यांना गोव्यात नेले होते. या अपहरण प्रकरणात संशयित अपहरण प्रकरणात समीर व्हनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांचा सहभाग असल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हटले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास सोपवला होता.

सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून इंगळे यांच्या जबाबानुसार संशयित समीर होनवाडे, अजित कट्टीकर, आनंद ऊर्फ गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर या चौघांना अटक केली. चौघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेचे प्रा. मोहन वनखंडे व पंचायत समितीच्या उपसभापतींचा मुलगा अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून इंगळे यांचे अपहरण केल्याचे कबूल केले. त्यानुसार प्रा. वनखंडे, शेजूळ या दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होण्याच्या हालचाली सुरू झाल्यापासून दोघेजण ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. दोघांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

दोघेजण पसार झाले

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच वनखंडे यांचा मोबाइल शनिवारपासून बंद आहे. सध्या ते पसार झाले असून, गुन्हे अन्वेषणचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच दोघांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिस तपासाकडे लक्ष

सभापती निवडीवेळी भाजपचे सर्वाधिक सदस्य असूनही सभापती निवडीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिंदेसेनेच्या सदस्य अपहरण प्रकरणामुळे निवडीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे काय? याचा तपास सुरू आहे. त्यामुळे तपासाकडे लक्ष लागले आहे.

पिस्तुलाबाबत चौकशी

इंगळे यांनी चौघांनी अपहरण करताना मोटारीत पिस्तुलाचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी चौघांची कसून चौकशी सुरू केली आहे. अपहरण प्रकरणात पिस्तूल वापरले होते काय? वापरले असेल तर त्याचा परवाना होता काय? याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *