patgaon murdar news : पाटगाव जंगलातील ’ती’ राख मानवाची नाहीच!, मुंबई फॉरेन्सिकचा अहवाल; बेपत्ता माजी सरपंचांबाबत आणखी गूढ वाढले : भुदरगड तालुक्यातील पाटगावचे बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी पाटगाव जंगलातून ताब्यात घेतलेली राख एसआयटीने तपासणीसाठी मुंबईतील कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठवली होती. तपासणीचा अहवाल आला असून, त्यात मानवी डीएनएचे कोणतेही अंश सापडले नाहीत. अहवालावरून ती राख पिळणकर यांची नसल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तपासाची दिशा बदलल्याचे पोलिसांनी सांगितले.
patgaon murdar news : पाटगाव जंगलातील ’ती’ राख मानवाची नाहीच!, मुंबई फॉरेन्सिकचा अहवाल; बेपत्ता माजी सरपंचांबाबत आणखी गूढ वाढले
पाटगावचे सरपंच पिळणकर सात जानेवारी 2026 रोजी सायंकाळी गावातून बेपत्ता झाले. पोलिसांना तपासादरम्यान पाटगावच्या जवळच जंगलात राख मिळाली होती. त्या राखेत मानवी अवशेष आहेत काय? याच्या शोधासाठी कोल्हापुरातील फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण केले होते. त्यांनी घटनास्थळी पोहोचून राखेची तपासणी केली होती. मात्र, त्यात मानवी अवशेष असल्याचे पुरावे मिळाले नव्हते. त्या राखेची पुन्हा दुसर्या लॅबकडून तपासणी करण्याची मागणी नातेवाइकांनी केली होती.
त्यानुसार जप्त केलेली राख एसआयटीने मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवली होती. तपासणीचा अहवाल आला असून, त्यात मानवी डीएनएचे अंश आढळले नाहीत. त्यामुळे जंगलातील राख पिळणकर यांची नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राखेचा पुरावा निरुपयोगी ठरल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. पिळणकरांच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्स काढून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पुन्हा चौकशी केली जात आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात केलेले आर्थिक व्यवहार, मध्यस्थी, खरेदी-विक्री याची माहिती काढली जात आहे. खबर्यांद्वारे पाटगाव परिसरातून गोपनीय माहिती काढण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. यातून एखादा सुगावा हाती लागेल असा एसआयटीच्या अधिकार्यांना विश्वास आहे.
बेपत्ता पिळणकरांचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या तपासाबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्याला पूर्णविराम देण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केली. एसआयटीच्या स्थापनेला तीन आठवडे उलटूनही काही ठोस माहिती तपासातून समोर आलेली नाही. त्यामुळे बेपत्ता पिळणकरांचे नेमके काय झाले? याचे गूढ आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











