ashta news : आष्ट्यात नशेसाठी ट्रेमीमाईड इंजेक्शनच्या विक्रीचा पर्दाफाश : तरुणाईला नशेसाठी ट्रेमीमाईड इंजक्शनची जादा दराने विक्री करण्यासाठी ऑनलाईन मागवून त्याचा साठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आष्टा येथील घाटगे मळा परिसरातून दोघा युवकांना अटक केली असून त्यांच्याकडून 26 हजार 766 रुपयांची ट्रेडमीमाईड इंजक्शन हस्तगत केली आहेत.
ashta news : आष्ट्यात नशेसाठी ट्रेमीमाईड इंजेक्शनच्या विक्रीचा पर्दाफाश
दोघांना केली अटक : स्थानिक गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई : ऑनलाईन खरेदी करून ज्यादा दराने विक्री.
अभिषेक भिमराव सरवदे (वय 26, रा. शिराळकर कॉलनी, आष्टा) आणि रेहान रफीक मुजावर (20, रा. गोर्डे चौक, आष्टा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वाढत्या नशेखोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संजीव झाडे यांनी याकरिता स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. पोलीस उपनिरिक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी संजय पाटील आणि अभिजीत ठाणेकर यांना आष्टा हद्दीतील घाटगे मळा परिसरातील श्रीराम नाष्टा सेंटर समोर दोघेजण दुचाकीवरुन नशेची इंजक्शन विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळाने दुचाकीवरुन दोघेजण येवून थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत ट्रेमीमाईड इंजक्शनच्या 78 बाटल्या आढळून आल्या. सदर इंजक्शन विक्री करण्याचा परवाना दोघांकडेही नव्हता.
पोलीस चौकशीत इंजक्शनच्या बाटल्या संशयितांनी ऑनलाईन मागविल्याचे निष्पन्न झाले. या इंजक्शनचा वापर प्रामुख्याने युवक नशेकरिता वापर करीत असल्याने त्याची जादा दराने विक्री करण्यासाठीच ती मागविली असल्याची कबुली दोघांनी दिली. दोघा संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली 1 लाखाची दुचाकी तसेच 26 हजार 766 रुपयांची इंजक्शन असा मुद्देमाल जप्त केला.
संशयितांवर औषधीद्रव्ये आणि सौदर्यप्रसाधन अधिनिमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, हणमंत लोहार, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, प्रमोद साखरपे, गणेश शिंदे, विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी आणि अभिजित पाटील यांच्या पथकाने केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










