motegavkar news : डॉक्टर घडवणारी फॅक्टरी की पेपरफुटीचा अड्डा? : देशभरात लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाने आता महाराष्ट्रातील तथाकथित “शिक्षणसम्राटां”चा चेहराच उघडा पाडला आहे. डॉक्टर आणि इंजिनिअर घडवण्याचा दावा करणाऱ्या कोचिंग साम्राज्याच्या मालकाला अखेर सीबीआयच्या बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लातूरच्या प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासचे सर्वेसर्वा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आणि शिक्षणक्षेत्रात एकच भूकंप झाला.
motegavkar news : डॉक्टर घडवणारी फॅक्टरी की पेपरफुटीचा अड्डा?
मोटेगावकराच्या 100 कोटींच्या कोचिंग साम्राज्याला सीबीआयचा दणका
एकेकाळी “लातूर पॅटर्न”चे पोस्टर बॉय म्हणून मिरवणारे मोटेगावकर सर आज गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्यभरातील हजारो पालक आपल्या मुलांचे डॉक्टर-इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून लाखो रुपये खर्च करून आरसीसीच्या दारात रांगा लावत होते. “रिझल्टची मशीन” म्हणून प्रसिद्ध असलेल्या या क्लासमधून जेईई आणि नीटमध्ये टॉपर घडत होते. पण आता याच यशामागे संशयाची काळी सावली निर्माण झाली आहे.
2003 मध्ये सुरू झालेल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसपासून मोटेगावकर यांनी कोट्यवधींचे शिक्षण साम्राज्य उभे केले. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला अशा अनेक शहरांमध्ये शाखा वाढवत त्यांनी शिक्षणाचा अक्षरशः उद्योग उभारला. वर्षाला तब्बल 100 कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या क्लासकडे “डॉक्टर-इंजिनिअर बनवणारी फॅक्टरी” म्हणून पाहिले जात होते.
एम.एस्सी. केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक अशी प्रतिमा तयार करण्यात आली. पण आता प्रश्न असा विचारला जातोय की, हे यश केवळ मेहनतीचे होते की त्यामागे काही वेगळे गणित चालत होते?
नीट पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर कुणीतरी पैशांचा बाजार मांडला का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. शिक्षणाच्या मंदिरातच जर भ्रष्टाचाराचा विळखा पडत असेल, तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर?
सीबीआयच्या कारवाईनंतर आता शिक्षणक्षेत्रातील अनेक मोठी नावे तपासाच्या रडारवर आल्याची चर्चा सुरू आहे. लाखो पालकांच्या आशा, विद्यार्थ्यांची स्वप्ने आणि कोट्यवधींचा शिक्षण व्यवसाय — या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेले मोटेगावकर सर आता तुरुंगाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षणविश्वात ही अटक केवळ एक घटना नसून, संपूर्ण कोचिंग इंडस्ट्रीला हादरवून सोडणारा मोठा धक्का मानला जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










