sangli mnp news : सांगलीच्या राजकारणात खळबळ! दोन नगरसेवक भाजपच्या गळाला

SHARE:

sangli mnp news : सांगलीच्या राजकारणात खळबळ! दोन नगरसेवक भाजपच्या गळाला : सांगलीच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड खळबळ उडाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना विलक्षण वेग आला आहे. सोमवारी सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एक मोठा राजकीय डाव टाकत सांगली महापालिकेत जयंत पाटील यांच्या गटाला मोठा हादरा दिला आहे.

sangli mnp news : सांगलीच्या राजकारणात खळबळ! दोन नगरसेवक भाजपच्या गळाला

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जयंत पाटील यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूला ओढत जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली होती. त्या वेळी जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादांना राजकीय शह दिल्याचे बोलले जात होते. सांगलीच्या राजकारणात हा विजय जयंत पाटील यांच्या रणनीतीचा मोठा नमुना मानला गेला होता. मात्र आता त्याच डावाला प्रत्युत्तर देत चंद्रकांतदादांनी ‘जशास तसे’ उत्तर दिल्याचे चित्र दिसू लागले आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन नगरसेवक हे जयंत पाटील यांच्यासाठी महत्त्वाचे मानले जात होते. पण याच तीनपैकी दोन नगरसेवकांना भाजपने आपल्या गळाला लावली आहे. गटनेते युवराज शिवाजीराव गायकवाड आणि नगरसेवक सुरेश लक्ष्मण बंडगर यांनी सोमवारी मध्यरात्री पुण्यात जाऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली.

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आले. पुण्यात उशिरापर्यंत झालेल्या खलबत्त्यांमध्ये पुढील राजकीय रणनीती आखण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे बोलले जात असून, या दोन्ही नगरसेवकांचा आज मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.

केवळ दोन नगरसेवकांचा प्रवेश ठरणार नाही; तो जयंत पाटील यांच्या सांगलीतील राजकीय बालेकिल्ल्याला दिलेला थेट धक्का मानला जाईल. विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही घडामोड महाविकास आघाडीसाठी चिंतेची घंटा ठरू शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता सांगली जिल्ह्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार हे निश्चित झाले आहे. जयंत पाटील विरुद्ध चंद्रकांतदादा असा सामना पुन्हा एकदा रंगणार असून, या राजकीय बुद्धीबळाच्या पटावर पुढची चाल कोणाची भारी ठरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *