raju shetti news : कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले; चहाच्या कपातून नव्या समीकरणांची चर्चा : ऊस आंदोलनाच्या रणांगणात एकेकाळी खांद्याला खांदा लावून लढणारे दोन लढवय्ये काळाच्या ओघात राजकारणाच्या वाटा वेगळ्या झाल्या, भूमिका बदलल्या, विचारांचे तट निर्माण झाले आणि मैत्रीच्या जागी कटुतेची किनार निर्माण झाली. मात्र, शुक्रवारी इंदापूरच्या न्यायालय परिसरात घडलेलं एक दृश्य महाराष्ट्राच्या राजकीय आणि शेतकरी वर्तुळासाठी अक्षरशः चर्चेचा विषय ठरलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झुंजार नेते राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे आक्रमक नेते आमदार सदाभाउ खोत अनेक वर्षांनंतर एकाच टेबलावर बसले आणि ‘चाय पे चर्चा’ रंगली!
raju shetti news : कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले; चहाच्या कपातून नव्या समीकरणांची चर्चा
इंदापूर न्यायालयाच्या आवारात चहाचा कप हातात घेत दोन्ही नेते जुन्या आठवणींमध्ये रमलेले दिसत होते. त्यांच्या चेहर्यावरचा सहजपणा, गप्पांमधील मोकळेपणा आणि वातावरणातील आपुलकी पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनाही काही क्षणांसाठी जुने दिवस परत आल्याची जाणीव झाली. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात एकत्र लढलेले हे दोन चेहरे पुन्हा एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर काहींच्या मनात आशेचा किरणही निर्माण झाला.
या भेटीमागे कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता, ना कुठली गुप्त रणनीती तर कारण होतं तब्बल पंधरा वर्षांपूर्वीच्या ऊस आंदोलनाचं. 2011 साली उसाला योग्य दर मिळावा म्हणून राज्यभर पेटलेल्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्या आंदोलनात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनाची धग इतकी तीव्र होती की अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि त्यात राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. त्या जुन्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शुक्रवारी इंदापूर सत्र न्यायालयात तारीख होती.
न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर दोन्ही नेते कोर्टाबाहेर आले आणि अचानकपणे एकाच हॉटेलमध्ये जाऊन एकत्र चहा घेण्याचा निर्णय झाला. एका टेबलावर समोरासमोर बसलेले राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पाहताच परिसरात एकच कुजबुज सुरू झाली. काही वेळासाठी राजकारण, आरोप-प्रत्यारोप, मतभेद आणि कटुता बाजूला पडली आणि उरल्या त्या फक्त आंदोलनाच्या आठवणी! जुन्या संघर्षांच्या कथा, आंदोलनातील प्रसंग आणि शेतकर्यांच्या लढ्याची चर्चा करत दोन्ही नेत्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ही भेट केवळ योगायोग होती की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची चाहूल, यावर आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. कारण महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीतील हे दोन्ही नेते केवळ व्यक्ती नाहीत, तर एका मोठ्या आंदोलनाची ओळख आहेत. त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर दूरगामी होऊ शकतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, सध्या राज्यात पुन्हा एकदा ऊस दराचा प्रश्न तापू लागला आहे. आगामी साखर हंगाम तोंडावर असताना शेतकरी चिंतेत आहेत. अशा वेळी शेतकर्यांच्या हक्कासाठी लढणारे दोन जुने लढवय्ये पुन्हा एकत्र दिसल्याने ग्रामीण भागात नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक शेतकरी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत या भेटीनंतर एकच प्रश्न होता – ही फक्त चहाची भेट होती, की नव्या शेतकरी आंदोलनाची नांदी?
इंदापूरच्या त्या साध्या चहाच्या कपाने आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचं वादळ निर्माण केलं आहे आणि राज्यभरातील शेतकर्यांचं लक्ष लागलं आहे, या दोन जुन्या सहकार्यांच्या पुढच्या पावलाकडे!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










