ajra news : आजरा पं. स.च्या सभापती जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैद्य; राष्ट्रवादीला धक्का : आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री संजय गाडे (जयश्री मारुती कदम – वडीलांकडील नाव ) यांचा कुणबी जातीचा दाखला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अवैध ठरविला आहे.
ajra news : आजरा पं. स.च्या सभापती जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैद्य; राष्ट्रवादीला धक्का
पडताळणी समितीने गेले दोन महिने याबाबत सुनावणी घेऊन आज हा निकाल दिला. या निकालामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. साधना संजय केसरकर यांनी गाडे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत पडताळणी समितीकडे आक्षेप घेतला होता.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत जयश्री गाडे ( रा. भादवण ) या राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट )यांच्या पक्षाकडून इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असलेल्या भादवण गणातून निवडून आल्या. आजरा. पं.स.चे सभापतीपद इतर मागास महिलेसाठी राखीव असल्याने त्या सभापतीही झाल्या.
जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैद्य असल्याबाबत साधना संजय केसरकर यांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडे 21 फेब्रूवारीला आक्षेप नोंदविला. 5 मार्चला पहिली तारीख होती. त्यानंतर चार तारखांना दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. 5 जूनला अंतिम सुनावणी झाली.
त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष सुषमा सातपुते, सदस्य भारत केंद्रे व सदस्य सचिव संभाजी पोवार यांनी अंतिम निकाल दिला आहे.
जयश्री गाडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांचा कुणबी ( इतर मागासवर्ग ) जातीचा दावा सिद्ध होत नसल्याने तो अमान्य करण्यात आला आहे. तर उपविभागीय अधिकारी आजरा – भुदरगड यांच्याकडून प्राप्त झालेला कुणबी ( इतर मागासवर्ग ) जातीचा दाखला अवैद्य ठरविण्यात आला आहे. या आदेशाविरुद्ध दाद मागावयाची असल्यास उच्च न्यायालय मुंबई यांचे सर्किट बेंच कोल्हापूर यांचेकडे भारतीय संविधान अनुच्छेद 226 नुसार याचिका दाखल करता येईल असे निकालपत्रात म्हटले आहे.
उपविभागीय अधिकार्यांची दिशाभूल व फसवणूक
जयश्री गाडे यांनी कुणबी जातीचा दाखला मिळविण्यासाठी चुकीचे व खोटे मोडी लिपीतील लिप्यांतर केलेले असल्याचे सिद्ध होते. चुकीच्या व खोट्या लिप्यांतर केलेल्या पुराव्याच्या आधारे उपविभागीय अधिकार्यांची दिशाभूल व फसवणूक करून जातीचा दाखला मिळविला असल्याचेही निकाल पत्रात म्हटले आहे.
याबाबत सभापती जयश्री गाडे म्हणाल्या, जात पडताळणी समितीला कुणबी जातीबाबत सर्व अधिकृत पुरावे दिले आहेत. तक्रारदारांनी राजकीय वैमनस्य व नैराश्यतून तक्रार दाखल केली आहे. समितीच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










