vedant bandgar khun sangli news : वेदांत बंडगर खून प्रकरणातील निलेश गडदे टोळीवर मोक्का : संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणार्या वेदांत बंडगर (वय 14) याच्या खून प्रकरणातील एन.जी. ग्रुप (निलेश गडदे) टोळीवर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. गडदे टोळीवरील गंभीर गुन्ह्यांची मालिका लक्षात घेता पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मोक्काचा प्रस्ताव पाठवला होत्या. या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली. गडदे टोळीने आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी सुरु केली होती. त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षकांनी टोळीला दणका दिला आहे. यामध्ये टोळीप्रमुख निलेश गडदे आणि अल्पवयीन मुलासह नऊ जणांचा समावेश आहे.
vedant bandgar khun sangli news : वेदांत बंडगर खून प्रकरणातील निलेश गडदे टोळीवर मोक्का
निलेश गडदे, महंमद नदाफ आणि बालकासह 9 जणांना दणका
विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार यांची कारवाई.
मोक्का कारवाई मध्ये टोळी प्रमुख निलेश विठोबा गडदे, किरण शंकर लोखंडे (दोघे रा. वाघमोडेनगर, कुपवाड), विशाल बिरुदेव चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले ( दोघे रा. पिंपळवाडी, अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ), महंमद जमाल नदाफ (वय 42 रा. अभयनगर, संजयनगर, सांगली) अतुल दादासो वायदंडे (वय 28 रा. खंडेराजुरी ता. मिरज), संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे (वय 23 रा. मूळ ढालगाव सध्या चाणक्य चौक कुपवाड), मलिक सलीम शेख (रा. दत्तनगर, कुपवाड), आणि अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे.
मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात-गडदे गटांत वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे, म्हणून संशयित नीलेश गडदे दबाव आणत होता. 10 जूनला रात्री सातला गडदे याने दोन साथीदारांसह खरात यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. ही माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला.
संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त झाला. पोलिसांनी गडदेसह साथीदारांच्या संशयितांच्या मुसक्या आवळल्या. या खून प्रकरणी एकूण 9 आरोपींना निष्पन्न करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले.
टोळी प्रमुख निलेश गडदे याने संशयित नऊ जणांना सोबत घेऊन एन. जी. ग्रुप हि टोळी निर्माण केली. सदरची टोळी हि जिल्ह्यातील सांगली, मिरज, कुपवाड, जत, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कगवाड आणि बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी परिसरात कार्यरत होती. या टोळीकडून 2017 ते 2026 या कालावधीत सतत गुन्ह्यांची मालिका सुरूच ठेवली होती. या टोळीने आर्थिक फायद्यासाठी, त्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी दहशत आणि हिंसाचाराचा उपयोग करून खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, विनयभंग, खुनाची भीती घालून खंडणी मागणे, अवैध घातक शस्त्रे जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवने, अमली पदार्थांची लागवड करणे, दहशत माजवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत.
या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये वाढीव कलमे लावण्यासाठी सरकारी अभियोक्ताचे सहाय्यक संचालक श्रीमती ज्योती डाके यांच्याकडून अभिप्राय घेऊन सदरचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याकडे सादर केला होता. सदरच्या प्रस्तावाचे अवलोकन करून मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पाठवला होता. रंजनकुमार शर्मा यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सराईत गुन्हेगार महंमद नदाफ, निलेश गडदे आणि अल्पवयीन मुलासह नऊ जणांवर मोक्काला मंजुरी दिली.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत हे करत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र यादव, प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, कर्मचारी बसवराज शिरगुप्पी, नागेश कांबळे, इम्रान मुल्ला, दीपक गट्टे यांच्या पथकाने केली.
यापुढे गुन्हगारी टोळ्यांवर कठोर कारवाई….
कोल्हापूर परिक्षेत्र आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. गुन्हेगारी वृत्तीस आळा घालण्यासाठी मोक्का सारख्या कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे. संघटित गुन्हेगारी करणार्या टोळ्यांवर यापुढे बारीक नजर ठेऊन त्यांचे कायदेशीररित्या समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










