विट्यात 38 लाखांचे 965 ग्रॅम एमडी जप्त

SHARE:

विट्यात 38 लाखांचे 965 ग्रॅम एमडी जप्त

एकजण ताब्यात; सांगली एलसीबीची कारवाई
केरळ ते मुंबईमार्गे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा संशय

विटा-तासगाव मार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 965 ग्रॅम मेफॅड्रॉन (एमडी) अमली पदार्थ जप्त केला. या एमडीची किंमत तब्बल 38 लाख 60 हजार रुपये असून, दोन मोबाईल, अल्टो कार आणि इतर साहित्य असा एकूण 42 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पाखरे (वय 32, रा. हिवरे ता. खानापूर), अब्दुल निझार मोईद्दीन कुणी ऊर्फ आदिलखान (रा. थायल हाऊस, भेंडीचाळ, पेरुबला, पोस्ट ऑफीस, ठेक्कील, जि. कासारगोड, केरळ) व मोहम्मद शेमीर ऊर्फ समीर, (रा. कोसारगोड, केरळ) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पाखरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातून केरळ, मुंबई आणि कतारपर्यंत पोहोचणार्‍या अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कचा पर्दापाश झाला आहे.
अमली पदार्थांची विक्री, तस्करी, साठा आणि उत्पादन करणार्‍यांविरोधात कारवाई करण्याच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सक्रिय होते. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंखे यांना दत्तात्रय पाखरे हा एमडी विक्रीसाठी विटा-तासगाव रस्त्यावरील श्री मंगल कार्यालयासमोर चारचाकी वाहनातून येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना देण्यात आली. त्यानंतर पंच, अधिकृत वजनकाटा धारक, फोटोग्राफर आणि आवश्यक साहित्य घेऊन पोलिांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
पोलिसांचे पथक घटनास्थळी निगराणी करीत असताना एक पांढर्‍या रंगाची चारचाकी तेथे येऊन थांबली. पोलिसांनी दत्तात्रय पाखरे याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटच्या खाली एका प्लॅस्टिकच्या पिशवीत फिकट पिवळसर रंगाची बारीक पावडर आढळली. तसेच वाहनाच्या डिकीमध्ये सीएनजी टाकीच्या खाली लाल-पांढर्‍या रंगाच्या रिकाम्या कॅप्सूल असलेली प्लॅस्टिकची पिशवीही आढळून आली. फॉरेन्सिक पथकाकडून प्राथमिक तपासणी केल्यानंतर पावडर हा अमली पदार्थ असल्याची खात्री झाली.
या कारवाईत पोलिसांनी 965 ग्रॅम एमडीसह एकूण 42 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे करीत आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
केरळ-मुंबई ते कतार तस्करी
संशयित पाखरे हा केरळमधील अब्दुल निझार मोईद्दीन कुणी ऊर्फ आदिलखान याच्या संपर्क होता. आदिलखान याने ऑगस्टच्या सुरुवातीला पाखरेला कतार येथे एक बॅग घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यासाठी 13 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोहा, कतार येथे जाण्याचे विमान तिकीटही पाठविले. त्यानुसार तो मुंबई विमानतळावर गेला. तेथे आदिलखानचा परिचित मोहम्मद शेमीर ऊर्फ समीर, (रा. केरळ) याने त्याला बॅग दिली. मात्र पाखरे कतारला न जाता मोबाईल बंद करून मुंबईहून आपल्या गावी परतला.
कॅप्सूलमधून ड्रग्जची तस्करी
गावी आल्यानंतर पाखरे याने बॅग उघडली असता त्यामध्ये पांढर्‍या आणि लाल रंगाच्या कॅप्सूल आढळल्या. त्या कॅप्सूल फोडून पाहिल्या असता त्यामध्ये एमडी पावडर असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सर्व कॅप्सूल फोडून त्यातील पावडर एकत्र केली आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरली. हीच पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने अल्टो कारमधून घेऊन विटा येथे आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास
या प्रकरणात कॅप्सूलमध्ये एमडी भरून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एमडीचा स्रोत, मुंबईतील संपर्क, केरळमधील संबंधित व्यक्ती आणि कतारपर्यंत जाणार्‍या तस्करीच्या संभाव्य मार्गाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जप्त केलेल्या एमडीच्या पुढील तपासणीसह संबंधित व्यक्तींच्या संपर्कांचीही चौकशी केली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *