अध्यक्ष उपाध्यक्षांसह 32 जणांवर गुन्हे दाखल.
गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करून डीजेचा मोठ्या आवाजात वापर केल्याप्रकरणी कसबे डिग्रज व समडोळी येथील चार गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षासह 32 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मंडळाचे पदाधिकारी, डॉल्बी मालक, ऑपरेटर तसेच ट्रॅक्टर चालकाचा समावेश आहे.
रविवारी कसबे डिग्रज येथे ओंकार मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान डॉल्बीचा वापर करण्यात आला. या वेळी डॉल्बीच्या ध्वनिक्षेपकाचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष बबन कोळी, उपाध्यक्ष अभिषेक अरुण लोहार, पदाधिकारी समीर शाबुद्दीन पठाण, संकेत दिलीप गोसावी आणि सागर प्रकाश कोळी (सर्व रा. कोळीवाडा, कसबे डिग्रज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डॉल्बीचे मालक प्रमोद निवृत्ती शिंदे (रा. वाठार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), डॉल्बी ऑपरेटर निखील राजेंद्र हावळ (रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले) आणि ट्रॅक्टर चालक व मालक सिकंदर शौकत फकीर (रा. कोळीवाडा, कसबे डिग्रज) यांचाही समावेश आहे. तर कसबे डिग्रज येथीलच शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष सतीश भोरे, उपाध्यक्ष निलेश माने, डीजेमालक रवींद्र पाटील, ऑपरेटर अभिजित कुंभार याच्यासह 8 जणांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
समडोळी (ता. मिरज) येथील न्यू सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष सम्मेद मुंढे, उपाध्यक्ष स्वप्नील वठारे, डीजेमालक सागर ठिल्लारे, ऑपरेटर रोशन नरवाडे (दोघे, रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह सात जण तर आशिर्वाद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब कोळी, उपाध्यक्ष रोहन कोळी, डीजेमालक गणेश जाधव (रा. दहिवडी, ता. तासगाव), ऑपरेटर गणेश हंकारे (रा. वायफळे, ता. तासगाव) यांच्यासह नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलिस करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











