23 ऑक्टोंबर रोजी मतदान, 27 ऑक्टोंबरला मतमोजणी, राजकारण तापणार
निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. 6 ऑक्टोंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. निवडणूक जाहीर झाल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी राजकारण तापणार आहे. दरम्यान ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत.
मागील काही दिवसांपासून पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरु होत्या. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठीची मतदारयादी प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू होत्या. अखेर निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर ही आहे. 7 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होईल. 9 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढणार असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद लाड आणि प्रताप ऊर्फ भय्या माने यांच्यातील संभाव्य लढतीने महायुतीतील जागावाटपाचा पेच ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून लाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी माने यांच्या उमेदवारीला हिरवा कंदिल दर्शवला आहे. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने लाड विरुद्ध माने’चा संभाव्य सामना कोणत्या पक्षाच्या झेंड्याखाली रंगणार, याबाबत उत्सुकता आहे.
शिक्षक मतदारसंघातही उमेदवारीचा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी तसेच वाडिया महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. सचिन सानप या दोघांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यंदाही विद्यमान आ.जयंत आसगावकर यांनी पुन्हा तयारी सुरु केली असून, त्यांच्या राजकीय समीकरणांमध्ये आ. सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम
- अधिसूचना जारी होणार ः 29 सप्टेंबर
- उमेदवारी अर्ज दाखलची अंतिम मुदत ः 6 ऑक्टोबर
- उमेदवारी अर्जांची छानणी ः 7 ऑक्टोंबर
- अर्ज माघारीची मुदत ः 9 ऑक्टोंबर
- मतदान ः 23 ऑक्टोबर
- मतमोजणी ः 27 ऑक्टोबर.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











