dudhgaon news : दुधगावच्या मातीचा जागतिक दरबारात झळकणारा गौरव : दुधगावच्या सुपीक मातीतून घडलेले, अभ्यासाच्या प्रकाशात घडत गेलेले एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व—संदीप हेगडे—आज जागतिक संशोधनविश्वात मानाचा मुजरा मिळवत आहे. युनायटेड किंग्डममधील शतकाहून अधिक काळ आपली वैचारिक परंपरा जपणाऱ्या प्रतिष्ठित कॉमनवेल्थ संस्थेचा राऊंडटेबल २०२५–२६ पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
dudhgaon news : दुधगावच्या मातीचा जागतिक दरबारात झळकणारा गौरव
राष्ट्रकुलातील ५६ देशांमधील सर्वोत्तम संशोधकांमध्ये होणाऱ्या तीव्र स्पर्धेतून, कठोर आणि काटेकोर मापदंडांवर निवडले जाणारे मोजकेच चेहरे—त्यात दुधगावच्या या सुपुत्राचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे.
हा सन्मान केवळ पुरस्कार नाही; तो सांगली जिल्ह्याच्या कर्तृत्वाचा, महाराष्ट्राच्या बौद्धिक सामर्थ्याचा आणि ग्रामीण भारताच्या स्वप्नांचा जागतिक पटलावर उमटलेला ठसा आहे. आय.आय.टी. बॉम्बेसारख्या देशातील सर्वोच्च शिक्षणसंस्थेत घडलेली शैक्षणिक पायाभरणी आणि सध्या जगातील अग्रक्रमांकित युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबर्ग (यू.के.) येथे रिसर्च फेलो म्हणून सुरू असलेली त्यांची वाटचाल—या प्रवासानेच आज हा ऐतिहासिक क्षण साकारला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत संदीप हेगडे युनिस्को-संबंधित जागतिक विज्ञान परिषदेच्या सदस्य संस्थेत सहभागी होणार असून, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील मान्यवर ह्यूमन सायन्स रिसर्च कौन्सिलमध्ये कार्य करण्याची दुर्मीळ संधी त्यांना लाभणार आहे. दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि निवडक युरोपीय देशांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, धोरण-अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करत ते तुलनात्मक संशोधन करणार आहेत.
या साऱ्या अभ्यासाला दिशा देणार आहे केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधक आणि ह्यूमन सायन्स रिसर्च कौन्सिलच्या संचालिका प्रा. शर्लिन स्वार्ट्झ यांचे मार्गदर्शन. जागतिक संशोधनविश्वातील सर्वोत्तम नावांपैकी एक असलेल्या प्रा. स्वार्ट्झ यांच्या टीममध्ये काम करणे म्हणजे स्वतःच आंतरराष्ट्रीय सन्मानाची मोहोर.
संदीप यांचा अभ्यास उपनिवेशकालीन वारशाचा आजच्या धोरणांवर होणारा प्रभाव, तसेच सामाजिक श्रेणी आणि धोरणात्मक मौनाचा शैक्षणिक संरचनेवर होणारा परिणाम यांचा सखोल शोध घेणार आहे. हा अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणधोरणे आणि सामाजिक समता याविषयीच्या चर्चांना नवी दिशा देणारा ठरेल.
दुधगावच्या आकाशातून उडालेली ही बुद्धीची झेप आज जागतिक क्षितिजावर पोहोचली आहे. संदीप हेगडे यांची ही निवड म्हणजे—गावाच्या मातीला लाभलेला मान, जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा जागतिक साक्षात्कार.
Author: अमोल कुदळे, दुधगाव
अमोल कुदळे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. तरुण भारत मध्ये तें सध्या असून राजकीय लाईव्ह साठीही लिखाण करतात.











