पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे पहिले आमदार

SHARE:

पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे पहिले आमदार

वासुदेव बळवंत गोगटे!

ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणारे, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भूमीत क्रांतीची ठिणगी पेटविणारे आणि पुढे पुणे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून जाणारे वासुदेव बळवंत गोगटे हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि क्रांतिकारी इतिहासातीमल एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व!
आज पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या हालचाली, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी, पदवीधर मतदारांच्या भेटीगाठी आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.
गत निवडणुकीत क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अरुण लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवून विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, या मतदारसंघाच्या इतिहासाची पाने उलटली, तर स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारी संघर्षापासून ते लोकशाहीच्या सभागृहापर्यंतचा एक विलक्षण प्रवास नजरेसमोर उभा राहतो. पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रथम आमदार होण्याचा मान क्रांतिकारक वासुदेव बळवंत गोगटे यांना मिळाला. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारणारा हा तरुण पुढे पदवीधरांच्या मतांवर विधान परिषदेवर पोहोचला, ही बाब या मतदारसंघाच्या इतिहासाला एक वेगळीच ऐतिहासिक उंची प्राप्त करून देते.
वासुदेव बळवंत गोगटे यांचा जन्म आणि जडणघडण अशा काळात झाली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना 1931 साली ब्रिटिश सत्तेचा दबदबा संपूर्ण देशावर होता. त्याच काळात मुंबईचे तत्कालीन कार्यवाहक गव्हर्नर आणि गृहमंत्री सर अर्नेस्ट हॉटसन हे ब्रिटिश प्रशासनाचे एक महत्त्वाचे अधिकारी होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गोगटे यांनी हॉटसन यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. हॉटसन यांच्या कपड्यांवरील धातूच्या बटणामुळे गोळी अडवली गेली आणि ते या हल्ल्यातून बचावले. गोळीबारानंतर गोगटे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या धाडसी कृत्याने ब्रिटिश प्रशासनात खळबळ उडाली.
क्रांतिकारी कार्यामुळे तुरुंगवास भोगावा लागलेल्या गोगटे यांची 1937 मध्ये सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिक्षणाची वाट पुन्हा धरली. एलएलबीची पदवी संपादन केली आणि वकिली व्यवसाय सुरू केला.
गोगटे हे हिंदू महासभेचे सदस्य होते. अखिल भारत हिंदू महासभा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या संघटनेची स्थापना आणि विस्तार हा ब्रिटिशकालीन 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली. या घटनेनंतर हिंदू महासभेशी संबंधित व्यक्तींवरही कारवाई झाली. हिंदू महासभेचे सदस्य असल्यामुळे गोगटे यांनाही या हत्येनंतरच्या घडामोडींमध्ये पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला.
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. नव्या राज्याच्या निर्मितीनंतर लोकशाही संस्थांची उभारणी आणि विधान परिषदेच्या कार्याला नवे स्वरूप प्राप्त झाले. याच ऐतिहासिक कालखंडात 1960 मध्ये वासुदेव बळवंत गोगटे पुणे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी तरुण वयात संघर्ष केला, त्याच देशाच्या राज्य विधिमंडळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याची संधी त्यांना मिळाली. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहोचणे हा त्यांच्या संसदीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता. क्रांतिकारक, कायदेतज्ज्ञ, नगरसेवक, महापौर आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असा त्यांचा बहुआयामी प्रवास महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद घेण्याजोगा आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *