चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपमधील काही जण महाविकास आघाडीकडे इच्छूक आहेत. त्यांना तिकडून उभारायचे असेल तर भाजप सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल उभे रहावे, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपमधील काहींना लगाविला. तर भाजपकडून इच्छुकांनी अर्ज भरावेत पण पक्ष आदेश आल्यानंतर माघार घ्यावी, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक येथील खरे क्लब हाऊस येथे पार पडली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, नीता केळकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जण विरोधकांच्या सहकार्याने निवडणूक लढविण्याचा विचार करत आहेत. ज्यांना तिकडून (विरोधकांच्या सहकार्याने) उभारायचे आहे त्यांनी भाजपच्या पद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल, असा स्पष्ट इशारा दिला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व 21 जागांसाठी आपण अर्ज भरायचे आहेत. जे इच्छुक आहेत त्या सर्वांनी अर्ज भरावेत. मात्र उमेदवार निश्चित झाल्यानंतर ज्यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल त्यांना मागे घ्यावे लागतील असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपमधील अनेक जण पॅनलसोबत असल्याचे दाखवायचे आणि विरोधकांचे काम करायचे असा प्रकार होतो तो बंद झाला पाहिजे, असे मत मांडले. तर राहुल महाडिक यांनी गेल्या निवडणुकीत आपल्याला मदत झाली नसल्याची खंत व्यक्त केल्याचे समजते. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. ही बैठक यापूर्वीच व्हायला हवी होती. तयारीला वेळ मिळाला असता असे मत काहींनी मांडले.
दहा वर्षानंतर एक टर्म गॅपची होती मागणी…
अनेक घरात वर्षांनुवर्षे सत्ता राहील असे कायदे सहकारात होते. मी सहकार मंत्री असताना सहकारातील काही कायदे बदलण्याचे काम केले. या दरम्यान रिझर्व्ह बँकेला निवेदन दिले होते. सहकारी बँकेतील सदस्यांना दहा वर्षानंतर एक टर्म तरी गॅप टाकायला लावा, असे म्हटले होते. त्याची अंमलबजावणी वर्षभरापूर्वी रिझर्व बँकेने केली असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











