jayant patil news : अण्णाभाऊंचा पुतळा नव्या पिढीला ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देईल ः आ.जयंत पाटील

SHARE:

jayant patil news : अण्णाभाऊंचा पुतळा नव्या पिढीला ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देईल ः आ.जयंत पाटील : वाळवा तालुक्याचे सुपुत्र, जगतविख्यात थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर कामगार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्यांनी आपल्या लेखणीतून मागास व उपेक्षित समाजातील माणसांना नायक बनविले. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान अनमोल आहे. अण्णाभाऊ साठे यांचा उरूण ईश्वरपूर येथील हा पुतळा नव्या पिढीला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करीत ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देईल. असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

jayant patil news : अण्णाभाऊंचा पुतळा नव्या पिढीला ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देईल ः आ.जयंत पाटील

येथील कोर्टासमोरील चौकात राजारामबापू सह.बँकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रा.शामराव पाटील, प्रा.डॉ.सुकुमार कांबळे, बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष उत्तम चांदणे, डॉ.विजय चांदणे, शंकर महापुरे,डॉ. सुधाकर वायदंडे, प्रा.डॉ.सुभाष वायदंडे, नंदकुमार नांगरे, विकास बल्लाळ, तानाजी साठे, माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, बाळासाहेब पाटील, विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

टक्कर आंदोलनात रक्त सांडलेले रामभाऊ देवकुळे, बापूराव बडेकर, भास्कर चव्हाण यांचा क्रांती योद्धा पुरस्काराने तर क्रांती नायक पुरस्काराने विकास बल्लाळ यांचा सन्मान झाला. संतोष चव्हाण यांनी संविधान वाचन केले. आ. पाटील म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचा उरूण ईश्वरपूरात पुतळा उभारताना आम्हास अभिमान आहे. येत्या 8-9 महिन्यात सर्वांच्या सहमतीने पुतळ्याचे काम पूर्ण करू. अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी पुतळ्याचे शानदार सोहळ्याने उद्घाटन करू.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अधिकाराने हजारो वर्षांची वर्णव्यवस्था उध्वस्त करून माणसाला जगण्याचा अधिकार दिला. अण्णाभाऊ साठे यांनी एक पुस्तक माझे वडील स्व.राजारामबापू पाटील यांना अर्पण केल्याचे माझ्या पाहण्यात आले. सावित्रीमाई साठे म्हणाल्या, इस्लामपूरात अण्णाभाऊंचा पुतळा उभारताना पाहून समाधान वाटते. संपूर्ण समाज अण्णाभाऊंचा वारस आहे. विजयसिंह मोहिते-पाटील, आ.जयंतराव पाटील यांनी वाटेगावात शिल्पसृष्टी उभारली. अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करावे.

प्रा.डॉ.सुकुमार कांबळे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी पृथ्वी शेषाच्या फणावर तरली नसून ती कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरली असल्याचा विचार दिला आहे. सध्या देशात जात, धर्म, भाषा आणि राज्या-राज्यात वाद निर्माण केले जात आहे. जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणार्‍या कार्यकर्त्यांना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नवे बळ देईल. अण्णाभाऊ व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते होते. डॉ.विजय चांदणे, शंकरराव महापुरे, डॉ.सुधाकर वायदंडे, प्रा.डॉ.सुभाष वायदंडे, मेजर आकाश तिवडे यांनी भाषणात पुतळा उभारणीचा संघर्ष मांडला.

शाहीर रमेश बल्लाळ व सहकार्‍यांचा शाहीर कार्यक्रम झाला. युवा गायक निलेश साठे यांनी अण्णाभाऊंची छक्कड व भीम गीत सादर केले. बी.के.पाटील, पै.भगवान पाटील, सुभाष सुर्यवंशी, दादासाहेब पाटील, संजय पाटील, अरुणादेवी पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, पुष्पलता खरात, शशिकांत पाटील, डॉ.अशोक पाटील, संदीप पाटील, अरुण कांबळे, संजय बनसोडे, विजय लोंढे, संजय खवळे, विनोद बल्लाळ, शशिकांत वायदंडे, गॅब्रियल तिवडे, शैलेश सुर्यवंशी, शंकर चव्हाण, संग्राम जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.शामराव पाटील यांनी स्वागत केले. उत्तम चांदणे यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. सागर चव्हाण यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *