jayant patil news : सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचे विश्वासू बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज भरणार

SHARE:

jayant patil news : सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचे विश्वासू बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज भरणार : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. या 17 जागांमध्ये सातारा सांगलीच्या जागेचा समावेश आहे. मविआकडून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

jayant patil news : सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचे विश्वासू बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज भरणार

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 1 जून शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीनं सर्व जागा लढवण्याची भूमिका घेतली होती. त्या जागा वाटपात सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आली आहे.

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादी कडून पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आणि जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.

सातारा आणि सागंली स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी अगोदर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.

महायुतीत जागा वाटपात सातार्‍याची जागा भाजपकडून लढवली जाणार आहे. या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपमध्ये सातार्‍यात सुनील काटकर, धैर्यशील कदम तर सांगलीतून सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि शेखर गोरे यांची नावं आघाडीवर आहेत.

शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा अर्ज

सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो कायम ठेवण्यासाठीच अर्ज केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं सातारा सांगलीच्या जागेवर तानाजीराव पाटील यांचा अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास निवडणूक तिरंगी होऊ शकते.

सातारा सांगली मतदारसंघातील पक्षीय बलाबल

सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील मतदारांची संख्या 895 इतकी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून 315 मतदार भाजपकडे आहेत. यानंतर दुसर्‍या स्थानी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असून त्यांचे 205 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे 119 मतदार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकेडे 111,काँग्रेसकडे 73 आणि अपक्ष 30 आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 1 मतदार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *