जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापार्‍यांवर सशस्त्र दरोडा;

SHARE:

जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापार्‍यांवर सशस्त्र दरोडा;

बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या उमदीजवळ संख विजापूर रोडव भीवर्गी फाट्यावर तामिळनाडूमधून माडग्याळमध्ये मेंढ्यांच्या बाजारात व्यापारासाठी निघालेल्या व्यापार्‍यांवर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. जत तालुयातील माडग्याळ येथे मेंढी खरेदीसाठी तामिळनाडूमधील सेलम येथून काही व्यापारी ट्रकमधून (केएस-51-एएस-7279) मधून येत होते. आज (11 सप्टेंबर) सकाळी साडेचार ते पाच वाजणेच्या सुमारास भिवर्गी फाटा येथे आल्यानंतर व्यापार्यांच्या ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ मोटार आडवी लावण्यात आली.
20 लाख रूपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली
कार आडवी लागल्याने ट्रक चालकाने ट्रक थांबवला. या दरम्यान, स्कार्पिओतून खाली उतरलेल्या सात ते आठ जणांनी ट्रकमध्ये असलेल्या व्यापार्यांना जवळ असलेला ऐवज तत्काळ द्या अन्यथा, मारले जाल अशी धमकी देत धक्काबुक्कीही केली. मारहाणीच्या भीतीने मेंढ्या खरेदीसाठी आलेल्या काही व्यापार्यांनी जवळ असलेली रक्कम चोरट्यांच्या हाती सुपुर्द केली. ट्रकमधील व्यापार्याकडून सुमारे 20 लाख रूपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. यानंतर बंदुकीचा धाक दाखवत व्यापार्‍यांकडे असलेली दोन तोळे वजनाची सोनसाखळी आणि दोन मोबाईलही लंपास केले.
चोरट्यांनी स्कार्पिओतून धूम ठोकली
या दरोड्यात सुमारे 30 लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्यानंतर चोरट्यांनी स्कार्पिओतून धूम ठोकली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ माजली असून लुटले गेलेल्या व्यापार्यांनी तात्काळ उमदी पोलीस ठाण्यात जाउन याबाबत माहिती दिली आहे. पोलीसांना माहिती मिळताच उमदी पोलीसांचे पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून संशयितांच्या शोधासाठी पथक नियुक्त केले आहे. याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक विशेष पथकही यासाठी जतसह कर्नाटकातील विजयपूर परिसरात संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.
अज्ञाताविरूध्द दरोड्याचा गुन्हा उमदी पोलीस ठाण्यात दाखल
याबाबत पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी सांगितले, चोरट्यांनी कोणालाही मारहाण केलेली नसली तरी बंदुकीचा धाक दाखवून लुटले असल्याने अज्ञाताविरूध्द दरोड्याचा गुन्हा उमदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येत आहे. या घटनेतील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी उमदी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली असल्याचे अधिक्षक दोशी यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *