kasbe digraj election : एका गणात कोंडी, दुसर्यात पोकळी : कसबे डिग्रजमधील अनोखी निवडणूक : मिरज तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेल्या कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदार संघाने यंदा संपूर्ण तालुक्याचेच नव्हे, तर जिल्ह्याचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतले आहे. कारण हा मतदार संघ आता केवळ निवडणुकीचा रणांगण राहिलेला नाही, तर तो राजकीय डावपेचांचा, गणितांचा आणि अनपेक्षित वळणांचा महाकाव्यच बनला आहे.
kasbe digraj election : एका गणात कोंडी, दुसर्यात पोकळी : कसबे डिग्रजमधील अनोखी निवडणूक
इथे लढत केवळ दुरंगी वा तिरंगी न राहता थेट चौरंगी, पंचरंगी आणि त्याही पुढे जाऊन बहुरंगी होत चालली आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात दोन पंचायत समितीचे गण असणे ही नेहमीची रचना असते; पण कसबे डिग्रजमध्ये यंदा चित्र पूर्णपणे उलटं आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची रांग लागली आहे, मात्र पंचायत समितीच्या जागा मात्र अपुर्या पडत आहेत. हाच या मतदार संघाचा सर्वात मोठा राजकीय विरोधाभास ठरत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट), जनसुराज्य शक्ती, शिवसेना (शिंदे गट), रयत आघाडी यांसारखे प्रमुख पक्ष, त्याचबरोबर अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत मैदानात उतरले आहेत. पण या सार्यांनाच एका ना एका गणात उमेदवारांच्या अभावाची कोंडी भोगावी लागत आहे.
काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी प्रशांत अवधूत मैदानात आहेत. त्यांच्या जोडीला कसबे डिग्रज पंचायत समिती गणात सुधीर देशमुख आहेत; मात्र नांद्रे गणात काँग्रेसचा उमेदवारच नाही. अपक्ष उमेदवार स्वप्निल नलवडे यांचीही अवस्था वेगळी नाही-डिग्रजमधून साथ आहे, पण नांद्रे गणात पोकळी आहे.
मौजे डिग्रजमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे कुमार पाटील जिल्हा परिषदेसाठी रिंगणात आहेत. त्यांना नांद्रे गणातून संयोगिता कोळी यांची साथ लाभली आहे; मात्र डिग्रज गणात त्यांचा उमेदवार नसल्याने ही जोडीही अपूर्ण ठरते. जनसुराज्य शक्तीचे प्रदीप पाटील यांना नांद्रे गणातून मुल्ला हे उमेदवार आहेत, पण डिग्रजमध्ये उमेदवार नाही. त्यांच्या मित्रपक्ष भाजपने मात्र पंचायत समितीसाठी स्वतंत्र उमेदवारी दिल्याने समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.
शिवसेना (शिंदे गट) कडून नांद्रेचे महावीर पाटील मैदानात आहेत, तर कसबे डिग्रजमधून अरुण पवार उमेदवार आहेत. मात्र या गटालाही एका गणात उमेदवाराची कमतरता भेडसावत आहे. रयत क्रांतीतर्फे रावसाहेब ऐतवडे जिल्हा परिषदेसाठी उभे असले तरी, त्यांच्या पाठिशी दोन्हीही पंचायत समिती गणात उमेदवार नाहीत-ही बाब त्यांच्या लढतीला वेगळाच रंग देणारी ठरत आहे.
एकूणच काय, तर कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदार संघात प्रत्येक उमेदवाराची कुठल्या ना कुठल्या गणात कोंडी होत आहे. कुणाला नांद्रेचा आधार नाही, कुणाला डिग्रजचा, तर कुणाला दोन्हींचा. त्यामुळे ही निवडणूक केवळ मतांची नाही, तर राजकीय समन्वय, रणनीती आणि अपूर्ण जोड्यांची कसोटी ठरणार आहे.
यंदाची ही लढत कोणाच्या बाजूने झुकणार, हे सांगणे कठीण असले तरी एक गोष्ट मात्र नक्की-कसबे डिग्रजचा हा रणसंग्राम इतिहासात ‘सर्वाधिक चर्चेचा मतदार संघ’ म्हणून नोंदवला जाणार आहे
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











