kasbe digraj news : कसबे डिग्रज : ‘महायुती’चा पाऊस, राजकारणाच्या जमिनीवर नव्या उमेदीची पालवी

SHARE:

dineshkumar aitawade

kasbe digraj news : कसबे डिग्रज : ‘महायुती’चा पाऊस, राजकारणाच्या जमिनीवर नव्या उमेदीची पालवी : मिरज पश्चिमचा कसबे डिग्रज गट, जणू एक संथ वाहणार्‍या नदीसारखा. वरून शांत भासणारा, पण आतून खदखदणारा! या मतदारसंघात सत्ता, सत्तापरिवर्तन आणि गटबाजी यांचं सुरेख मिश्रण पाहायला मिळतं. काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, आणि आता नव्याने आकार घेत असलेली महायुती – प्रत्येकजण इथे आपली वाट शोधतोय… आपली जागा साकारतोय!

kasbe digraj news : कसबे डिग्रज : ‘महायुती’चा पाऊस, राजकारणाच्या जमिनीवर नव्या उमेदीची पालवी

सत्तेच्या साखळ्या तुटताहेत… नवीन साखळ्या जुळताहेत…!

गेल्या निवडणुकीत या गटाने काँग्रेसच्या विशाल चौगुले यांना जिल्हा परिषद प्रतिनिधित्वाची संधी दिली. मात्र पंचायत समितीच्या पातळीवर राष्ट्रवादी आणि अपक्षांचे ‘घोडे’ पुढे निघाले. ही ताकद फिरती समीकरणं म्हणजे कसबे डिग्रजच्या राजकीय मातीचा गंधच जणू.

या गटात कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पद्माळ, आणि नांद्रे ही गावं राजकारणाच्या नकाशावर नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. पण आता निवडणुकीचे रणशिंग पुन्हा एकदा वाजू लागले आहे आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे… अगदीच वेगळं चित्र उभं राहतंय.

नांद्रे – भाजपच्या पावलांनी गती घेतलेले गाव

नांद्रे गावात भाजपचा वटवृक्ष पूर्वीपासूनच रोवलेला होता, पण अलीकडील काळात तो नव्या पालवांनी फुलत गेला. मदन पाटील गटाच्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच, पद्माळ व नांद्रेमध्ये भाजपची ताकद लक्षणीयपणे वाढली. याच गावात नरसगोंडा पाटील, राहुल सकळे, बाळासाहेब पाटील यांसारखे प्रभावी कार्यकर्ते भाजपच्या छत्राखाली आले आणि आता नांद्रे हे भाजपगृहीत धरावे असे गाव झालं आहे, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

जयाभाउ नलवडे आणि विशाल चौगुले एकत्र आल्यास महाविकास आघाडीला संधी

डिग्रजमध्ये काँग्रेसचे विशाल चौगुले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयाभाउ नलवडे यांच्यात सवतासुभा आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणात दोघे एकमेकांच्या विरोधात आहेत. मतदार संघात महायुतीला रोखायचे असेल तर मतभेद विसरून दोघांना एकत्र यावे लागेल. गेल्यावेळी नांद्रे गावाने विशाल चौगुले यांना तारले होते. परंतु यंदा वातावरण वेगळे आहे.

विनायक जाधव – रयत क्रांतीचा उमेदीचा नवा चेहरा

कसबे डिग्रजमधील राजकीय रंगमंचावर आता सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा झेंडा हळूहळू फडकू लागला आहे. आणि त्या झेंड्याखाली एक नवा चेहरा प्रकाशझोतात आला आहे – विनायक जाधव. त्यांनी डी.पी.डी.सी.च्या माध्यमातून गावात विविध विकासकामे उभी करत, सत्ताधार्‍यांना घाम फोडला आहे. सध्या त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत थेट दोन हात करण्याची तयारी केली असून, महायुतीकडून उमेदवारीची शक्यता आहे.
गट आरक्षण ’ओपन’ पडल्यास स्वत: तर महिला आरक्षण आल्यास पत्नीला रिंगणात उतरवण्याची रणनीतीही आखली आहे.

राजकारणात जिथे अनेक वर्षांची चूल पेटलेली असते, तिथे नवे तव्यावर भाजले जाणारे राजकारणी दुर्मिळ असतात – विनायक जाधव त्यातलेच एक वाटतात.

मौजे डिग्रज – गटबाजीच्या छायेत सत्तेचा झगडा

मौजे डिग्रजमध्ये जयंत पाटील गटाची पारंपरिक ताकद मोठी असली तरी, निशिकांत पाटील गटानेही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. येथे छुपे खेळाडूही आहेत – जे मतदानाच्या दिवशीच ‘राजकारणाचे शिल्पकार’ ठरू शकतात.

मौजे डिग्रजमध्ये भालचंद्र पाटील यांनीही सध्या बर्‍यापैकी बेरेजेचे राजकारण केले आहे. जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी गावात विकासकामाला गती दिली आहे. नांद्रे, कसबे डिग्रज या गावातही त्यांना मानणारा गट आहे. त्यामुळे त्याच्या ताकदीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

kasbe-digraj-news-kasbe-digraj-the-rain-of-mahayuti-the-sprout-of-new-hope-on-the-land-of-politics

पद्माळ – संग्राम पाटलांच्या रूपाने भाजपचा मजबूत शिलेदार

पद्माळ गावात संग्राम पाटील यांच्या रूपाने भाजपला एक मजबूत नेता लाभला आहे. त्यांचे नेतृत्व आणि गावी असलेला प्रभाव, महायुतीच्या गणिताला संजीवनी देणारा ठरणार आहे.

सचिन जगदाळेंचा एकाकी लढा

पद्माळ या वसंतदादांच्या गावात सचिन जगदाळे यांनी आपली ताकद राखून ठेवली आहे. गावकर्‍यांच्या साथीने त्यांना सरपंचपदाची खुर्चीही मिळाली होती. नांद्रे आणि कसबे डिग्रजच्या मानाने पद्माळ गाव खूपच छोटे असल्याने त्यांच्या कार्यावर कायमच पडदा पडत आला आहे. तरीही एकाकी लढा ते देत राहिले आहेत.

सत्तेचे संभाव्य चित्र – महायुती ‘टक्कर’ची तयारीत

एकंदरीत, कसबे डिग्रज गटातील राजकीय समीकरणे पार बदलली आहेत. काँग्रेसची सत्ता असली तरी जमिनीवरचे आकडे वेगळं गाणं गात आहेत. रयत क्रांती, भाजप, आणि स्थानिक प्रभावशाली गट यांच्या एकत्रित प्रयत्नांतून महायुतीने येथे जोरदार मुसंडी मारण्याची तयारी केली आहे.

या लढतीचा परिणाम केवळ या मतदारसंघापुरताच मर्यादित राहणार नाही, तर पुढील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद रचनेच्या दिशादर्शक राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे.

उद्या कुणाचं असेल, हे सांगणं कठीण आहे… पण आजची हवा महायुतीच्या दिशेने वाहताना दिसते आहे.
राजकारण म्हणजे निव्वळ जागा जिंकण्याचा खेळ नसतो, तो असतो विश्वास मिळवण्याचा संघर्ष. कसबे डिग्रजच्या मातीत हा संघर्ष आता शिगेला पोहोचत आहे…

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *