kasbe digraj zp news : कसबे डिग्रज मतदारसंघात नव्या चेहऱ्यांचा सूर ऐकू येतोय! : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघ — गेल्या साठ वर्षांपासून ‘ओपन’ राहणारा हा मतदारसंघ यंदाही ‘ओपनच’ राहिल्याने गावपातळीपासून जिल्ह्यापर्यंत राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पद्माळ आणि नांद्रे या चार गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात नवीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा सुरू असून राजकीय गोटांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
नांद्रे येथील युवा नेते राहुल सकळे, कसबे डिग्रज मधील उद्योजक सुकुमार चौगुले सावकार, युवा उद्योजक प्रशांत अवधूत, माजी सरपंच स्वप्निल नलवडे, विनायक जाधव पदमाळचे माजी सरपंच सचिन जगदाळे, बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे
पारंपरिक काँग्रेस बालेकिल्ला, पण यंदा समीकरण वेगळं!
कसबे डिग्रज मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर तो दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. जयश्रीताई पाटील, पृथ्वीराजबाबा पाटील आणि संग्राम पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय समीकरणांमध्ये भूकंप घडवला आहे. एकीकडे खासदार विशाल दादा पाटील आणि आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज भैय्या पवार यांचे या भागात जुने वर्चस्व आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीबाबा पाटील यांच्या एंट्रीमुळे भाजपची पाऊल घट्ट झाले आहे.
भाजपचे राहुलदादा महाडिक, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत या तिघांचेही प्रभाव क्षेत्र इथे वेगवेगळ्या प्रमाणात असल्याने या वेळीचा सामना म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी — आणि ती लढत चुरशीची, तापलेल्या रणभूमीची ठरणार हे निश्चित!
नांद्र्याचा युवा चेहरा — राहुल सकळे यांचा दमदार जनसंपर्क
नांद्रे येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती राहुल सकळे हे नाव सध्या भाजप गोटात सर्वाधिक चर्चेत आहे.
गेल्या पाच-सात वर्षांत त्यांनी माजी खासदार संजयकाका पाटील पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी जनसंपर्काचे जाळे उभारले आहे. “कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच” असा चंग बांधून त्यांनी तयारी सुरू केली आहे.
त्यांच्या सक्रियतेमुळे नांद्रे परिसरात नवा राजकीय उत्साह दिसतोय.
नांद्रेत घुमट पाटील गट, महावीर पाटील गट आणि एन एस पाटील गट हे तीन पाटील गट असून आत्ताच्या घडीला राहुल सकळे, महावीर भोरे, सुदर्शन हेरले, बाळासाहेब पाटील हे नवीन चेहरे राजकीय पटलावर पुढे आले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ, जयश्री पाटील, पृथ्वीराजबाबा पाटील, पृथ्वीराजभैय्या पवार यांच्यामुळे नांद्रेत भाजपची ताकद वाढली आहे. आजपर्यंत नांद्रेतून एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून जाऊ शकला नाही. सर्व गावाने मिळून जर एखादा उमेदवार दिला तर येथील लढत जोरदार होण्याची शक्यता आहे
उद्योग, समाजकारण आणि नव्या विचारांचा संगम — सुकुमार चौगुले
कसबे डिग्रजचे उद्योजक सुकुमार चौगुले हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राजकारण, समाजकारण, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. “मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सुकुमार चौगुले यांनी करावं” अशी मागणी गावोगावी उमटते आहे. त्यांची शांत, स्थिर पण प्रभावी राजकीय चाल अनेकांना विचारात पाडते आहे.
उद्योजकतेचा नवा चेहरा — प्रशांत अवधूत यांच्याकडेही सर्वांची नजर
युवा उद्योजक म्हणून कसबे डिग्रजचे प्रशांत अवधूत यांनी कमी कालावधीत चांगली छाप पाडली आहे.
अद्याप त्यांनी निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नाही, पण त्यांचे नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. “तरुणाईचा आत्मविश्वास आणि विकासाची दृष्टी असलेला चेहरा” अशी त्यांची प्रतिमा आहे.
रयत क्रांती संघटनेचे सज्ज सैनिक — विनायक जाधव
रयत क्रांती संघटनेचे विनायक जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षात राहून इमानी, ईतबारी काम करणारे नेते आहेत. महायुती जर एकत्रित लढली तर विनायक जाधव यांचे नाव ‘फायनल’ होऊ शकते, अशी चर्चाही रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी आधीपासूनच मैदान गाजवायला सुरुवात केली आहे.
विकास आणि नेतृत्वाची जोडी — स्वप्निल नलवडे
कसबे डिग्रजचे माजी सरपंच स्वप्निल नलवडे हेही या शर्यतीत महत्त्वाचे नाव मानले जात आहे. सरपंचपदाच्या कार्यकाळात गावात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. बाजार समितीचे संचालक आनंदराव नलावडे यांनी त्यांना अनुकूलता दर्शविल्याने त्यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली आहे.
गेल्या साठ वर्षाच्या कालावधी मध्ये बाळासाहेब मासुळे, श्रीपाल चौगुले, लीलाधर पाटील, विशाल चौगुले या कसबे डिग्रज मधील नेत्यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले आहे. डिग्रजमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांचे प्राबल्य आहे. परंतु आता रयत क्रांती संघटना, राहुल दादा महाडिक, निशिकांतदादा पाटील यांना मानणारा वर्ग ही तयार झाला आहे. त्यामुळे येथेही आता जोरदार लढत होणार अशी चर्चा आहे.
पदमाळचा सत्तेचा सूर — संग्राम पाटील व सचिन जगदाळे यांच्यात चर्चा रंगली
या छोट्या पण प्रभावी गावातून सध्या दोन नावं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत —सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन जगदाळे. दोघेही आपल्या मार्गाने सक्रिय, जनतेशी जोडलेले आणि गावोगावी संपर्क ठेवणारे नेते आहेत.
संग्राम पाटील — संघटनशक्ती, नियोजन आणि बाजार समितीतील अनुभव या त्रिसूत्रीवर उभं असलेलं व्यक्तिमत्त्व.
त्यांचा ओघवता संवाद आणि काटेकोर कार्यशैलीमुळे त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चांगला आधार मिळालेला आहे.
तर दुसरीकडे सचिन जगदाळे — राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण, धारदार आणि अभ्यासू नेते. त्यांची गावोगावी उपस्थिती आणि प्रत्येक स्तरावरील लोकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे त्यांच्या नावाला गती मिळत आहे. दोघांनीही आपल्या पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मतदारसंघात चर्चेचा झंझावात उठला आहे.
लहान गाव, मोठी अडचण — उमेदवारीचा समीकरणांचा खेळ
तथापि, पदमाळ हे मतदारसंघातील सर्वात लहान गाव असल्यामुळे उमेदवारीच्या गणितात काही व्यावहारिक अडचणी समोर येतात, हेही वास्तव आहे. मोठ्या गावांतील मतसंख्या, संघटनबळ आणि राजकीय तग धरण्याची क्षमता यामुळे लहान गावांचे नेते कधी कधी ‘संभाव्य उमेदवारांच्या यादीत मागे’ राहतात.
मात्र, पदमाळचं वैशिष्ट्य असं की, इथले लोक स्वार्थापेक्षा सन्मानाला प्राधान्य देतात. त्यामुळे या गावातून उमटणारा राजकीय आवाज लहान असला, तरी त्याचं प्रतिध्वनी दूरवर ऐकू येतो.
दोन विधानसभा क्षेत्रांच्या सीमेवरचे रणांगण
कसबे डिग्रज हा मतदारसंघ सांगली आणि इस्लामपूर या दोन विधानसभा क्षेत्रांच्या सीमारेषेवर येतो. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीवेळी येथे राजकीय समीकरणांचे नवीन प्रयोग आणि नव्या जोड्या दिसतात. या वेळीही ‘ओपन’ राहिलेल्या या मतदारसंघात तरुण नेतृत्व, नव्या चेहऱ्यांची शर्यत आणि गटबाजीचे गूढ अशी त्रिसूत्री रंगणार आहे.
निष्कर्ष
कसबे डिग्रज मतदारसंघ हा केवळ निवडणुकीचा परिसर नाही, तर तो सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील ‘ट्रेंडसेटर’ मतदारसंघ आहे.येथील निकाल अनेकदा जिल्हा परिषदेचा सूर ठरवतात —आणि म्हणूनच,
या वेळीचा सामना फक्त उमेदवारांचा नाही, तर विचारांचा, पिढ्यांचा आणि पक्षीय प्रतिष्ठेचा ठरणार आहे.
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.