kavtemankhal crime news : 30 लाखांच्या विम्यासाठी मेव्हण्यानेच दिली 3 लाखांची सुपारी; : विम्याचे 30 लाख रुपये मिळविण्यासाठी सख्ख्या बहिणीच्या पतीचा 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ तालुययातील चोरोची मध्ये घडला आहे. अपघाती मृत्यू अशी नोंद असताना कवठेमहांकाळ पोलीसांनी सखोल तपास केल्यानंतर हा खूनाचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी रविवारी दिली.
kavtemankhal crime news : 30 लाखांच्या विम्यासाठी मेव्हण्यानेच दिली 3 लाखांची सुपारी;
अपघाताचा बनाव झाला उघड
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर चोरोची (ता.कवठेमहांकाळ) येथील प्रेम ढाब्यासमोर गटारीत दत्तात्रय भगवान चावरे (वय 44) यांचा मृतदेह दि. 19 मे रोजी रात्री 11 वाजता आढळला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास केला असता हा अपघाती मृत्यू नसून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मृताच्या पत्नीचा भाउ रामचंद्र खिलारे (रा. विश्रामबाग) व तुकाराम सांगोलकर (रा. खेराव, ता. जत) या दोघा संशयितांना पोलीसांनी अटक केली आहे.
चोरोची येथील प्रेम ढाब्याजवळ चावरे यांचा मृतदेह आढळला होता. डोकीस गंभीर दुखापत झाल्याने प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा समज झाला होता. मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर हा मृत्यू गंभीर मारहाणीमुळे झाल्याचा निष्कर्ष समोर आल्यानंतर पोलीसांनी तपासाची दिशा बदलली.
घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, परिसरातील चित्रफितींची पडताळणी केल्यानंतर हा अपघात नसून खूनाचा प्रकार असल्याचे समोर येताच, पोलीसांनी कसून चौकशी केली असता मृताच्या पत्नीचा बंधूने बहिणीला सासरी होणारा त्रास आणि आयुर्विमा महामंडळाचा मृताच्या नावे असलेला 30 लाख रूपयांचा विमा ही मूळ कारणे समोर आली.
बहिणीला 30 लाख रूपये मिळावेत, आणि पतीच्या जाचापासून कायमची सुटका व्हावी यासाठी खिलारे यांनी सांगोलकर यांना 3 लाख रूपयांची सुपारी दिली. यापैकी 1 लाख रूपये रोख त्यांच्या टँकरचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दिले. आणि मृताला जिवंत असताना सांगोलकर याच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर सांगोलकर यांने चावरे यांना चोरोची जवळ नेउन दि. 19 मे रोजी डोकीत लोखंडी टॉमी घालून मारले. मृतदेह रस्त्याकडेच्या गटारीत टाकून पोबारा केला.
पोलीस हवालदार श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित रामचंद्र खिलारे (रा. अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली) व तुकाराम सांगोलकर (रा. खेराव, ता. जत) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून दत्तात्रय चाबरे यांच्या खुनासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मारहाण करून खून करण्यात आला आणि नंतर तो अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस कर्मचारी श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजित कटार, स्वप्नील पाटील तसेच सायबर पोलीस ठाण्यातील विजय पाटणकर व कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










