kolhapur accident news : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत

SHARE:

आठ महिन्यांची लेक बचावली : सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना

kolhapur accident news : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत :  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी जवळील कोगनोळी चेकपोस्टनजीक झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर शहरातील तरुण उद्योजक दांपत्याचा मृत्यू झाला. जिगर किशोर नाकराने (वय 24) आणि त्यांची पत्नी ऋतिका जिगर नाकराने (वय 24) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीचा मात्र सुदैवाने जीव वाचला आहे.

kolhapur accident news : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत

या दुर्दैवी घटनेमुळे कोल्हापूर शहरातील कळंबा परिसरात शोककळा पसरली आहे. जिगर आणि ऋतिका हे मूळचे कच्छ (गुजरात) येथील असले तरी गेल्या काही वर्षांपासून ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले होते.जिगर नाकराने हे प्लायवूड, लाकडी दरवाजे आणि संबंधित साहित्य निर्मितीचा व्यवसाय करीत होते. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये त्यांचा उद्योग सुरू होता.

सामुदायिक विवाह सोहळ्यात परतून येताना अपघात

शुक्रवारी सकाळी हे दांपत्य आपल्या आठ महिन्यांच्या मुलगी वृष्टीसह मोटारीने (एमएच 09 एफव्ही 3877 ) हुबळी येथे गेले होते. तेथे त्यांच्या समाजाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम आटोपून दुपारी सुमारे चारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे परत निघाले. कोगनोळी चेकपोस्ट नाक्याजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पावतीसाठी थांबलेल्या कंटेनरला त्यांच्या कारने मागून जोरदार धडक दिली.

भरधाव वेगामुळे कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या. पुढील सीटवर बसलेले जिगर आणि ऋतिका गंभीर जखमी झाले. मात्र मागील सीटवर पाळण्यात झोपलेली लहानगी वृष्टी सुरक्षित राहिली. कारचा मागील भाग तुलनेने सुरक्षित राहिल्याने तिला किरकोळ दुखापतीच झाल्या.

उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली

घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल करणार्‍या अवताडे कंपनीचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले. निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील, हवालदार परमानंद मारुसेठ आणि मंजुनाथ कल्याणी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास ऋतिकाचा मृत्यू झाला, तर मध्यरात्रीच्या सुमारास जिगर यांची प्राणज्योत मालवली. वृष्टीवर उपचार सुरू आहेत.

पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

या प्रकरणी जिगर यांचे नातेवाईक किमाजी नाजी पटेल (इचलकरंजी) यांनी कंटेनर चालक इम्तिहास अनवर अली (रा. राजस्थान) याच्याविरुद्ध निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिगर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि आठ महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. ऋतिकाचे माहेर सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *