kolhapur news : “आता पतूर कुठं होतास?” ; मुरगूडकरांचा उपरोधिक सवाल

SHARE:

kolhapur news : “आता पतूर कुठं होतास?” ; मुरगूडकरांचा उपरोधिक सवाल : कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले असून, शहरात राजकीय हालचालींचा तुफान गदारोळ सुरू झाला आहे. गल्लीबोळातून राजकारणाच्या कुजबुजींची चाहूल लागली आहे, तर नेत्यांच्या घरी-घरी भेटीगाठी, चर्चा, बैठका आणि आश्वासनांचा मेळावा रंगू लागला आहे.

kolhapur news : “आता पतूर कुठं होतास?” ; मुरगूडकरांचा उपरोधिक सवाल

मुरगूड नगरपरिषदेच्या रणधुमाळीला अनोख्या फलकाची रंगत!

प्रत्येक नेत्याच्या ओठांवर विकासाचे दावे, आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात जनतेपर्यंत पोहोचणारी नव्या वचनांची यादी!

परंतु या सगळ्या गदारोळात एका अनोख्या फलकाने मुरगूड शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. मध्यरात्रीच्या शांततेत, जणू कोणी राजकीय प्रबोधनाचा मशाल हाती घेतला असावा, अशा अंदाजात शहरातील सात ते आठ प्रमुख चौकांत लाल रंगाचे आकर्षक फलक लावण्यात आले.

या फलकांवर मोठ्या अक्षरांत लिहिले आहे —

“काय पाहिजे सांगा? मी तुमचं काम करतो, पोरग्याला नोकरीला लावतो, सुनेची शाळेत ऑर्डर काढतो, बँकेत कामाला लावतो, कारखान्यात ऑर्डर काढतो… मग आता पतूर कुठं होतास?”

या उपरोधिक प्रश्नाने मुरगूडच्या जनतेच्या मनातील विचारांना शब्द मिळाले आहेत.
जनतेला निवडणुकीत फक्त आश्वासनांची झडी नव्हे, तर जबाबदार नेतृत्वाची गरज आहे, हा संदेश या फलकातून मार्मिक पद्धतीने देण्यात आला आहे.

एस.टी. स्टॅन्ड, गणेश मंदिर, मुख्य रोड, हनुमान मंदिर, अंबाबाई मंदिर यांसारख्या शहराच्या प्रमुख ठिकाणी हे फलक झळकत आहेत. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरांत कोरलेला हा संदेश म्हणजे जणू राजकीय आभाळात चमकणारी वीजच!

हे फलक “सुजाण मुरगूडकर” या नावाने प्रसिद्ध झाले असून, सोशल मीडियावर त्यांचे फोटो अक्षरशः वणव्यासारखे व्हायरल होत आहेत. नागरिक, तरुण वर्ग, आणि राजकीय वर्तुळ या सगळ्यांमध्ये या घटनेची चर्चाचर्चा रंगली आहे.

निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुरगूडमध्ये हा फलक केवळ पोस्टर नव्हे, तर जनभावनेचा आरसा ठरत आहे.
एकीकडे उमेदवारांच्या गाड्या धूळ उडवत शहरभर फिरत आहेत, तर दुसरीकडे हा फलक जनतेच्या मनात प्रश्नांची वादळं निर्माण करत आहे —


राजकारण म्हणजे केवळ कामाचे आश्वासन की जनतेशी प्रामाणिक बांधिलकी?

या अनोख्या उपक्रमामुळे मुरगूड नगरपरिषदेची निवडणूक आता केवळ राजकीय लढत न राहता, बुद्धी आणि विवेकाची कसोटी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *