maratwada rain news : मराठवाडा पुरात बुडाले! घरात चिखल, पिके जमीनदोस्त, जनावरे दगावली

SHARE:

maratwada rain news : मराठवाडा पुरात बुडाले! घरात चिखल, पिके जमीनदोस्त, जनावरे दगावली: दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाल्याचं चित्र आहे. इतका मोठा पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं, तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात दोन दिवसात झालेल्या पावसात 8 जणांचा बळी गेला. तर बीड आणि धाराशिवमध्ये अजूनही मदतकार्य सुरूच आहे. तर जायकवाडी आणि माजलगाव धरणातून विसर्ग वाढल्यानं लष्कराचं पथक बोलवण्यात आलं आहे.

maratwada rain news : मराठवाडा पुरात बुडाले! घरात चिखल, पिके जमीनदोस्त, जनावरे दगावली

तुफान पावसात 8 जणांचा मृत्यू

मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सरासरी 604 मिमी पाऊस होत असतो. मात्र आता 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या. 31 लाख शेतकर्‍यांसाठी आर्थिक मदतीचा जीआर काढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मात्र ओला दुष्कार जाहीर करणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ सोडा, सर्वांना सर्वोतपरी मदत करणार असं आश्वासन देत ओला दुष्काळाबाबत थेट भाष्य करणं टाळलं.

शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना पूर परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेचे सर्व मंत्री आज किंवा उद्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.

लातूरमध्ये पीक पाण्याखाली गेलं

लातूरमध्ये हाताला आलेलं पीक पाण्यात गेल्यानं निलंग्यात महिलेनं आर्त टाहो फोडला. पुराच्या पाण्यात बैल अडकले, कोंबड्या वाहून गेल्या, शासन मदत करेना, वाचवा, वाचवा म्हणत महिलेने आर्त टाहो फोडला. गुंजर्गा गावात गुडघाभर पाण्यात जाऊन महिलेनं आक्रोश केला, तर महिलेचा टाहो बघून उपस्थितही हतबल झाल्याचं दिसून आलं.

धाराशिवमध्ये मोठं नुकसान

धाराशिव जिल्ह्यात पावसाने हैदोस घातला आहे. आंबी गावात पुराचं पाणी शिरल्याने मुकेश गटकळ यांचा संसार उघड्यावर आला. घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं असून, एबीपी माझाशी बोलताना घरातील माऊलीच्या अश्रुंचा बांध फुटला. यावेळी एबीपी माझाचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं. तर नागरिकांनी अन्न धान्य वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण मोठं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं.

maratwada-rain-news-marathwada-submerged-in-floods-mud-in-houses-crops-destroyed-animals-killed

जालन्यात पीक जमीनदोस्त

जालन्यातील दुधना काळेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा खरीप पिकांसह ऊस पिकाला मोठा फटका बसला. दुधना काळेगाव येथील शेतकरी प्रकाश भांदरगे यांचा दोन एकर ऊस जमीनदोस्त झाला. दुधना काळेगाव परिसरातील खरिपातील सोयाबीन, कपाशी मक्का पिकासह उसाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सादोळा गावाला गोदावरीच्या पुराचा फटका मोठा फटका बसला. सोयाबीन, ऊस, कापूस अशी सर्व पिकं पाण्याखाली गेल्यानं बळीराजावर मोठं संकट कोसळलंय. आता तरी सरकारनं मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

बीडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग गावातून वाहणार्‍या सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आला आहे. सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. तर नदीपात्र परिसरात अडकलेल्या स्थानिक नागरिकांना छऊठऋ टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. शिरसमार्ग गावाला सिंदफणा नदीचा पूर्णपणे वेढा पडला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वारंवार तहसील प्रशासनाकडून केलं जातंय.

बीडच्या परळी तालुक्यातील पोहनेर गावाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातल्याने रात्रीपासून पोहनेर गावचा संपर्क तुटलाय. आता गावात जाण्यासाठी फक्त चप्पूचाच पर्याय आहे. त्यातच गावातील गर्भवतीला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिला चप्पूच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर आणलं. प्रशासन नाही तर भोई बांधवच मदतीला येत असल्याचं महिलेच्या कुटुंबीयाने सांगितलं. या महिलेला परळीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

परभणीत दुधना नदीला पूर

सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे दुधनेला पूर आलाय आणि अनेक गावांना पाण्याने वेढा दिलाय. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावातील पूल पूर्णत: पाण्याखाली गेला. शेतीचंही मोठं नुकसान झालं. गावाला पाण्याने वेढा दिल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

हिंगोलीत हळद, सोयाबीन पाण्याखाली

हिंगोली जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणार्‍या ओढे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वसमत शहरातलगत असलेल्या नदीला पूर आला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाच ते सहा जणांची सुटका करण्यात आली. दोरीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढलं गेलं.
हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव शिवारातील शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. आसना नदीचे बॅक वॉटर शेतात शिरल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, हळद ही पिके पूर्णतः पाण्याखाली आली आहेत. शेतकर्‍यांना शेतातील सोयाबीनचे पीक पाण्यात शोधून काढाव लागत आहे, हजारो रुपये खर्च करून शेतात पेरणी केलेल पिकाचा चिखल झाल्यानं शेतकरी पूर्णत हतबल झाल्याचं चित्र आहे.

ओमराजे थेट पुराच्या पाण्यात, आजी-नातवाला वाचवलं

धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरु आहे. अशातच धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील स्वतः पुराच्या पाण्यात उतरून अडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचे बघायला मिळाले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात मदत केली आहे. ओमराजे निंबाळकरांचं मदतकार्य पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अधिक वाचा