neet exam news : सांगली जिल्ह्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

SHARE:

neet exam news : सांगली जिल्ह्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ’नीट’ 2026 परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र नीटचा पेपर फुटल्यामुळे ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधून पेपर फुटल्याचे तपासात उघड झाले असून शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती, सर्व विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

neet exam news : सांगली जिल्ह्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

नीटची फेरपरीक्षा द्यावी लागणार

आता फेरपरीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील पदवीच्या प्रवेशांसाठी नीटची परीक्षा घेतली जाते. तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो, मात्र आता पेपरफुटीमुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आल्याचेजाहीर करण्यात आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.

जिल्ह्यातील दहा केंद्रावर रविवारी उत्साहात पार पडली. 4518 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 4419 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 99 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा पार पडली.

रविवार दि. 3 मे रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत ही परीक्षा पार पडली. सांगली जिल्ह्यातील विलिंग्डन कॉलेज, वालचंद कॉलेज सांगली, सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, पटवर्धन हायस्कूल सांगली, पुरोहित कन्या प्रशाला सांगली, आर. एन. पाटील गर्ल्स हायस्कूल, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज, मिरज महाविद्यालय मिरज, मिरज हायस्कूल आणि शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव या दहा केंद्रांवर ही परीक्षा उत्साहात पार पडली.

परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांसोबतच केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर होती. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी यावर्षी आधारकार्ड आधारीत बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात आला. काही कारणास्तव बायोमेट्रीक प्रमाणीकरण अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांवर स्वयंघोषणापत्र घेऊन त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता.

कडाक्याच्या उन्हाळ्यात नीटची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत पार पडली. दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध केल्या होत्या. परीक्षेसाठी दुपारी दीडच्या आत केंद्रात प्रवेश देण्यात आला.

देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. अशा मोठ्या राष्ट्रीय परीक्षेमध्ये पारदर्शकता आणि विश्वास टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 2024 मध्येही पेपर लीकसारखी प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पुनर्परीक्षेच्या निर्णयामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया – मेरिट लिस्ट, काउन्सेलिंग, सीट अलॉटमेंट आणि कॉलेज अ‍ॅडमिशन – यामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम 2026-27 च्या शैक्षणिक वर्षावर होऊ शकतो.

याशिवाय, विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यास सुरू करावा लागणार आहे. आधीच तणावपूर्ण परिस्थितीतून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठी आव्हानात्मक बाब आहे. पुन्हा तयारी करणे, एकाग्रता टिकवणे आणि आत्मविश्वास राखणे हे कठीण ठरू शकते.

म्हणूनच आवश्यक ती कठोर कारवाई, अधिक मजबूत सुरक्षा व्यवस्था आणि भविष्यातील पर्यायी परीक्षा पद्धती (जसे ऑनलाइन परीक्षा पर्याय) यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास आणि त्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवणे हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *