panchayat raj abhiyan : जिल्ह्यातील 696 गावांत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरु,

SHARE:

ग्रामस्वच्छता अभियानाला आलेली मरगळ दूर करुन नवीन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला अखेर 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यामुळे जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींना नवसंजीवनी मिळणार आहे. लोकसहभागातून विकासाची गती वाढेल, ग्रामपंचायतींचे प्रशासन अधिक सक्षम होईल आणि ग्रामीण भाग डिजिटल क्रांतीशी थेट जोडला जाईल. आगामी तीन महिन्यांत गावोगावात ‘समृद्ध चळवळ’ उभारून राज्यातील ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श निर्माण होईल. त्यामुळे जिल्ह्यातील गावागावांत विकासाची स्पर्धा निर्माण होण्याच्या आशा आहेत.

panchayat raj abhiyan : जिल्ह्यातील 696 गावांत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरु

ग्रामविकासासाठी गावागावात स्पर्धा होणार

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि हागणदारीमुक्त गाव या योजनांनी महाराष्ट्रात विकासाची क्रांती घडवली. तत्कालीन ग्रामविकास मंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी सुरु केलेले अभियान देशभर पोहोचले. कालांतराने अभियानाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अभियानाला बे्रक मिळाला. आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संकल्पना मांडून मुहुर्तमेढ रोवली. त्याची सुरुवात जिल्ह्यातील तब्बल 696 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेने करण्यात आली.

हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार

ग्रामीण विकास विभागाच्या पुढाकाराने राज्यभर सुरु होणार्‍या या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायत प्रशासन सक्षमीकरण, लोकसहभागातून विकासाची चळवळ उभारणे आणि ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे हा आहे. हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर गौरवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण भागातील मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

ग्रामपंचायतींनी पारदर्शकतेने कामकाज करावे, डिजिटल माध्यमातून ग्रामस्थांना सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रशासनाविषयी विश्वास वाढावा या हेतूने या उपक्रमाला प्रारंभ होत आहे. ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेचा आलेख उंचावण्यासाठी आरोग्य, शिक्षण, महिला-बालविकास, सामाजिक न्याय, स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामसुरक्षा, हरितग्राम निर्मिती अशा महत्त्वाच्या विषयांवर गावागावात कृती आराखडे आखले जाणार आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींना स्वयंपूर्ण प्रशासनाची गती मिळावी, ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा, या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातील.

या अभियानात कामगिरीचे मूल्यमापन विशेष निकषांनुसार केले जाणार आहे.

लोकसहभाग, सेवा वितरणातील कार्यक्षमता, डिजिटलायझेशन, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि पर्यावरणपूरक उपक्रम या बाबींचा विचार करून तालुका, जिल्हा, विभाग आणि अखेरीस राज्यस्तरावर उत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले जाणार आहेत. हा सन्मान ग्रामपंचायतींचा उत्साह वाढवून इतरांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

panchayat-raj-abhiyan-chief-ministers-samruddhi-panchayat-raj-abhiyan-launched-in-696-villages-of-the-district

नवीन अभियानामुळे गावागावात विकासाची गती वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आजवर ग्रामीण भागात तक्रार निवारण, दाखले मिळविणे किंवा माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायतीत अनेकदा फेर्‍या माराव्या लागत होत्या. मात्र वेबसाईट आणि डिजिटल पद्धतीमुळे या प्रक्रिया सुलभ होणार आहेत. याशिवाय, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता अभियान, शाळांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम, शेतकर्‍यांसाठी कृषी सल्ला शिबिरे अशा योजनाही ग्रामसभांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

गावागावात या अभियानाबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

अनेक ग्रामस्थांचा विश्वास आहे की या माध्यमातून गावांचा चेहरा मोहरा बदलू शकेल. तरुण पिढी विशेषतः डिजिटल सेवांबाबत उत्सुक असून, प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने त्यांचा सहभाग वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी वेबसाईट
डिजिटल भारताच्या संकल्पनेशी सुसंगतपणे, या अभियानात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात येईल. या संकेतस्थळावरून ग्रामस्थांना अनेक सेवा घरबसल्या मिळतील. ग्रामपंचायतीशी संबंधित दाखले मिळणार आहेत. त्यामध्ये जन्म-मृत्यू दाखले, कर आणि शुल्काबाबतची माहिती, विविध योजनांचे अर्ज तसेच ऑनलाईन तक्रार व सूचना नोंदविण्याची सुविधा या माध्यमातून देश-विदेशात कुठूनही ग्रामस्थांना त्यांच्या गावाशी जोडले जाता येईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *