rajarambapu patil news :कार्यकर्ता आणि त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व घेणारे नेते- लोकनेते स्व.राजारामबापू पाटील !!

SHARE:

rajarambapu patil news :कार्यकर्ता आणि त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व घेणारे नेते- लोकनेते स्व.राजारामबापू पाटील !!: बापू हे वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते आहेत. त्यांनी खर्‍या अर्थाने तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासाचा पाया घातला आहे. वाळवा तालुक्याच्या विकासाच्या प्रत्येक मैलाचा दगड रोवलेले नेते म्हणजे बापू.

rajarambapu patil news :कार्यकर्ता आणि त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व घेणारे नेते- लोकनेते स्व.राजारामबापू पाटील !!

त्यावेळी आजच्या सारखी दळणवळणा ची साधने नव्हती. बापू बैलगाडीने, सायकलने गावात आलेले आम्ही पाहिले आहे. कृष्णा नदीवर पूल झाले नव्हते. नदीच्या पलीकडच्या गावांचा तालुक्याशी संपर्क कमी होता. नदीच्या पलीकडच्या भागात बापू गटाचे वर्चस्व कमी होते. तसेच कृष्णा नदी काठच्या गावात शेकापचे बलाढ्य कार्यकर्ते होते.

ताकारीचे स्व.डी.आर.पाटील (दादा),माझे चुलते स्व.शामराव पवार(तात्या) हे नदी पलीकडचे बापूंचे खंदे कार्यकर्ते. माझे वडील गावात सरपंच होते. ते गावचे राजकारण बघायचे. त्यानंतर येडेमच्छिंद्रचे भास्करराव पाटील (अण्णा),बिचुदचे सिताराम पाटील, नरसिंहपूरचे राजाराम थोरात अशी मजबूत फळी उभा राहिली. बापू गटाचे वर्चस्व निर्माण झाले. पुढे माजी खासदार स्व.विश्वासराव दाजी पाटील आले. डी.आर.दादांची एकमेव गाडी होती,त्यातून सर्वांचा प्रवास व्हायचा. त्यांच्या डेअरीत मिटींगा व्हायच्या. त्यावेळी कार्यकर्ते थोडे होते,परंतु अतिशय विश्वासू, जिवाभावाचे आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. आजच्या परिस्थितीत हे अतिशय महत्वाचे आहे.

मी 1960-61 ला 11 वी पास झालो. आमची शेतीवाडी मोठी असल्याने मी पुण्यात अग्रीकल्चर करावे,असे ठरले. पुण्याला ऍडमिशन घ्यायला आम्ही येतोय,असा चुलत्यांनी बापूंना निरोप दिला. आमच्या बरोबर गावचे एम.एन.पवारही होते.बापूंनी सहकार्य केले,अग्रीकल्चरला ऍडमिशन मिळाले. बापू त्यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. पक्षाचे मुख्य कार्यालय पुण्यात शिवाजीनगरला नदीकाठी होते. बापू या इमारतीच्या वरच्या मजल्यावर रहायचे. आम्ही त्यांना नेहमी भेटायचो. ते आमची आपुलकीने विचारपूस करायचे.

बापू खर्‍या अर्थाने आमचे पालक झाले. माझी एमस्सी झाली. मला पुण्यातील अग्रीकल्चर कॉलेजवर असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी अग्रीकल्चरवर शहरातील मुलांचे वर्चस्व होते. राज्य मंत्रीमंडळातील ग्रामीण भागातील मंत्र्यांनी असा निर्णय केला,ज्याला शेती आहे,ज्याच्या कुटुंबाच्या नावावर 7/12 आहे,त्यालाच अग्रीकल्चरला ऍडमिशन मिळणार. यातून ग्रामीण भागातील असंख्य मुलांना करिअरची नवी संधी मिळाली.

आम्ही सातारा,सांगली जिल्ह्यातील कृषी पदवीधर विद्यार्थ्यांची संघटना केली. काही कारणांनी दोन वेळा मोठा संप झाला. आम्ही संपाबद्दल बापूंच्या कानावर घातले,तेंव्हा बापू आमच्यावर रागावले. तुम्ही इथे शिकायला आला का हे उद्योग करायला?अशी आमची कान उघडणी केली. आम्ही चांगले शिकावे, करिअर करावे,ही बापूंची तळमळ होती.

पुढे मला स्व.बापू आणि स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने युरोपच्या 6 महिन्या च्या अभ्यास दौर्‍याची संधी मिळाली.
कृष्णा नदीला महापूर आला आणि मळीचे विजेचे खांब उन्मळून पडले होते. शेतकर्‍यांना विजेचा प्रॉब्लेम झाला. त्यावेळी बापूंनी गुडघाभर चिखलातून नदीकाठी दौरा केला. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर होतो. वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

बापू मंत्री होते. आम्ही त्यांना मुबईला मंत्रालयात भेटायला गेलो होतो. ते मंत्रालया तून खाली आले. आम्हाला घरी न्यायचे होते. त्यांनी चुलते आणि काही कार्यकर्त्यांना गाडीत घेतले. जागा नव्हती,तरी त्यांनी मला गाडीत बसविले. बापूंनी अक्षरशः मला मांडीवर बसवून घेतले. इतकी त्यांना कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबांबद्दल आत्मीयता, जिव्हाळा होता. आपल्या जिवाभावाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मुलांना त्यांनी राजकारणात आणून घडविली आहे.

आम्ही बापूंच्या एकषष्ठी निमित्त कारखाना व कार्यक्षेत्रात 61 हजार आंबा, नारळी,चिक्कू आदी फळझाडे लावली. बापूंना हुरडा,मक्याची कणसे,हरभर्‍याचे डहाळे,ओल्या शेंगा फार आवडत. त्यावेळी सातत्याने कोणा ना कोणा कार्यकर्त्यांच्या शेतात या हुरडा पार्ट्या व्हायच्या. बापूंना विनोदी माणसं आवडत. कामेरीचे स्व. शामरावमामा पाटील,तुपारीचे भाऊसारख्या कार्यकर्त्याबरोबर गप्पा मारताना आम्ही पाहिले आहे. आमचे गुर्‍हाळ होते. बापू नेहमी तिथे यायचे. घोंगड्यावर बसायचे. गावातील कार्यकर्ते,भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संवाद करायचे.

बापूंनी कारखान्यावर पाणी परिषद घेतली होती. स्व.रत्नाप्पा कुंभार प्रमुख पाहुणे होते. आपल्या तालुक्यास आडव्या पाटाने पाणी मिळावे हा आग्रह होता. पुढे चांदोलीस धरण बांधण्याचा मध्य काढण्यात आला. चांदोली धरणाचे काम सुरू होते.त्यावेळी आम्ही बापूंच्या सूचनेवरून तालुक्यातील शेतकरी,कारखान्याच्या सभासदांना हे धरण दाखविले. पुढे बापू जनता पार्टीत गेले. त्यावेळी गावातील काही थोड्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धाडसाने आपल्या घरावर झेंडा लावला,त्यात माझे घर होते,याचा मला अभिमान आहे.

प्रेमळपणा हा बापूंचा सर्वात मोठा गुण होता. प्रचंड सहनशीलता त्यांच्याकडे होती. बापू चिडलेले,कोणावर रागावलेले आम्ही कधी पाहिले नाही. दुसर्‍याच्या चुका पोटात घालून त्याला सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांनी आयुष्यात कधीही बदला घेण्याचे, खुनशी राजकारण केले नाही. दादा-बापू गटांच्या तीव्र संघर्षात कार्यकर्त्यांना जगणे मुश्कील होत असे. मात्र बापूंनी आपल्या पाठीशी उभा रहाणार्‍या कार्यकर्त्यांना,त्यांच्या कुटुंबांना कधी विसरले नाहीत,त्यांना कधीही अंतर दिले नाही.
स्व.बापूंना 106 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन॥

– बी.डी.पवार (आण्णा)
अध्यक्ष,राजारामबापू शुगर इन्स्टिट्यूट, इस्लामपूर.
शब्दांकन-विश्वनाथ पाटसुते
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *