दिनेशकुमार ऐतवडे
raju shetti news : स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत नेते नसले तरी रणनितीचा पट रंगणार… महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकरी आंदोलनांच्या इतिहासात आपली स्वतंत्र ठसा उमठवणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना यंदा आपल्या 24 व्या ऊस परिषदेसाठी सज्ज झाली आहे. ही परिषद येत्या 16 ऑक्टोबर रोजी पार पडणार असून, राज्यभरातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या एका कार्यक्रमाकडे खिळून राहिले आहे.
raju shetti news : स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत नेते नसले तरी रणनितीचा पट रंगणार…
मागण्या की संघर्ष?
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दर, एफआरपी, वाहतूक खर्च, कटाई यंत्रणा, शेतकर्यांच्या मालकीचे कारखाने, बाजार समित्यांची अवस्था या मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी शक्यता आहे. मात्र, यंदाची परिषद केवळ ऊस दरापुरती मर्यादित राहाणार नाही, तर ती एक राजकीय रणभूमी ठरणार आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
स्वाभिमानीची लढवय्यी परंपरा, मागण्या मांडताना रोखठोकपणा आणि आंदोलनाची तयारी, हीच संघटनेची ओळख. मात्र यंदा, ही ओळखच संकटात सापडली आहे.
नेते कुठं? खुर्च्या रिकाम्याच?
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील संघटनेत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी उलथापालथ झाली.
त्यांचे एकेक विश्वासू सहकारी-जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, जनार्दन पाटील-हे एकामागोमाग एक संघटनेपासून दूर गेले.
या माजी पदाधिकार्यांनी केवळ संघटना सोडली नाही, तर शेट्टींच्या नेतृत्वालाच खुले आव्हान दिलं. त्यामुळे यंदाच्या परिषदेत, व्यासपीठावर कोण उपस्थित राहणार? आणि कोणत्या ’खुर्च्या’ रिकाम्या दिसणार, हे मोठं औत्सुक्याचं ठरलं आहे.
राजू शेट्टींचा पुढचा डाव काय?
विधानसभा निवडणुकांचा माहोल तापतोय. अशा काळात शेतकरी संघटनेची परिषद म्हणजे फक्त आर्थिक मागण्यांचा नव्हे, तर राजकीय समीकरणांचा प्रास्ताविक ’ट्रेलर’ असतो.
राजू शेट्टी हे नवे नेते उभे करणार का? की ते पुन्हा जुन्यांनाच जवळ घेणार? भाजप-विरोधी भूमिका, की तटस्थता? की थेट नवीन आघाडीचा इशारा?
हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत, पण उत्तर मिळण्याचं केंद्र ठरणार आहे-16 ऑक्टोबरची परिषद.
शेतकरीच खरी ताकद?
भलेही संघटनेत फूट पडली असली, परंतु स्वाभिमानीचा खरा आधार नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी हा राहिला आहे.
म्हणूनच, जरी नेत्यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्या, तरही ही परिषद ’रिकामी’ ठरणार नाही, असं मानणार्यांची संख्याही मोठी आहे.
यंदाची ऊस परिषद नेत्यांविना की नव्या नेतृत्वासह? मागण्या मांडणार कोण? आंदोलन उभारणार कोण?
16 ऑक्टोबरच्या परिषदेवरून या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.
तेव्हा केवळ ऊस दर नाही, तर संघटनेचं भवितव्यही ठरवणारी ही परिषद ठरणार, एवढं मात्र नक्की!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











