raju shetti news : अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखाना बंद पाडू: राजू शेट्टी

SHARE:

raju shetti news : अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखाना बंद पाडू: राजू शेट्टी : साखरसम्राट कारखाने तोट्यात असल्याचे सांगतात, मग एक कारखानदार जादा साखर कारखाने कसे काढतात. कारखान्याचे अर्थकारण शेतकर्‍यांना सांगू नका, ज्या कारखान्यांची एफआरपी 3400 च्यावर आहे. त्यांनी एफआरपीवर शंभर रूपये अधिक दर द्यावा, याचा निर्णय 12 नोव्हेंबरपर्यंत घ्या, जे दर देणार नाहीत, त्यांचा कारखाना बंद पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खा. राजू शेट्टी यांनी सभेत दिला.

raju shetti news : अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखाना बंद पाडू: राजू शेट्टी

बुधगाव (ता. मिरज) येथे ऊस दर आणि शक्तिपीठ महामार्ग या याबाबत दत्त मंदिराच्या पटांगणात शनिवारी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राजू शेट्टी बोलत होते. यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख महेश खराडे, शेतकरी युवा नेते संदीप राजोबा, संजय बेले, माजी पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकर्‍यांचे वीस लाखाचे नुकसान झाले आहे त्यांना 18 हजाराची मदत मिळाली, ही शेतकर्‍यांची चेष्टा नाही तर काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दर द्यायला परवडतो मग सांगली जिल्ह्यात काय अडचण आहे? दरासंदर्भात दि. 12 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून त्यानंतर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा देण्यात आला.

ते पुढे म्हणाले, आमच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री आणि शक्तीपीठ महामार्गाबाबत भूमिका बदलली असून नव्या बदलानुसार सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यांना वगळून हा महामार्ग तयार होत आहे. पण हा महामार्गच रद्द होणे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होणार नाही आम्ही तो होऊ देणार नाही. नागपूर रत्नागिरी हा महामार्ग सहा किंवा आठ पदरी करा, त्यातील मधले दोन मार्ग एक्सप्रेस हायवेच्या धर्तीवर तयार करा त्याला आमची कोणतीही हरकत नाही. याच महामार्गाचे टोलचे पैसे वसूल होत नसताना पुन्हा दुसरा महामार्ग कशासाठी? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.

माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांच्या जीवावर उठला असून शासनामधील ज्यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती पार पाडत नसल्याने शेतकर्‍यांना त्रास होत आहे. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. बँकांनी शासनाकडून येणारे मदत शेतकर्‍यांच्या कर्जाला भरून घेऊ नये. सातबारा कोरा करावा, अशी मागणी देखील केली.

महेश खराडे म्हणाले, काटामारी आणि रिकव्हरी चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर रिकव्हरी काढली पाहिजे. साखर सम्राट गब्बर आणि शेतकरी कर्जबाजारी ही अवस्था बदलण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला.

यावेळी आनंदराव पाटील, विलास पाटील, रामदास पाटील, शेखर पाटील, पिके इंगळे, बाळासाहेब पाटील, अधिकराव पाटील उपस्थित होते. मनोहर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *