zp election news : ‘स्थानिक स्वराज्य’साठी महाविकास आघाडीचे जुळले

SHARE:

zp election news : ‘स्थानिक स्वराज्य’साठी महाविकास आघाडीचे जुळले : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरोधातील समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आ. जयंत पाटील व आ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आहे. याला आता यश येत आहे. आ. जयंत पाटील, आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी एकत्रित महाविकास आघाडी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोतर्ब केले असून भाजप विरोधातील इतर पक्षांना देखील बरोबर घेण्यात येणार आहे. माजी खा. संजयकाका पाटील यांना आघाडीबरोबर घेण्यासंदर्भात बोलणी सुरू झाली आहेत. तर माजी खा. राजू शेट्टी यांना देखील गळ टाकला जाणार आहे.

zp election news : ‘स्थानिक स्वराज्य’साठी महाविकास आघाडीचे जुळले

आ. जयंत पाटील, आ. विश्वजीत, खा. विशाल पाटील एकत्र; संजयकाका पण आघाडीत?

विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चार आमदार निवडून आले. शिवाय अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पंधरा दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर महापालिका होणार आहे. गेल्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये आघाडीला सत्तेपासून दूर रहावे लागले होते. अनेक पंचायत समित्यांवर भाजपने झेंडा फडकवला होता. महापालिकेची सत्ता देखील भाजपने घेतली होती. त्यामुळे यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपविरोधात राण उठवले होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी प्रथम काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांच्याशी चर्चा केली.

त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला होता. पण खा. विशाल पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबरोबर आघाडी करण्यास सकारात्मक नव्हते. त्यांनी आघाडी नको, अशी भूमीका खासगीमध्ये आ. विश्वजीत कदम यांच्याकडे मांडली होती. पण आ. विश्वजीत कदम यांनी आ. जयंत पाटील व खा. विशाल पाटील यांच्या समेट घडवून आणला आहे.

भाजपविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघच हवी असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर खा. विशाल पाटील यांनी देखील होकर दर्शवला. पण ज्या ठिकाणी काँग्रेसच्या हक्काच्या जागा आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सहकार्य करण्याची मागणी आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी केली. त्याला आ. जयंत पाटील राजी झाले आहेत.

तर दुसरीकडे भाजपविरोधातील समविचारी पक्ष एकत्र आणले जात आहेत. माजी खा. संजयकाका पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपविरोधात भूमीका मांडत आहेत. त्यांना देखील आघाडी घेण्याचा विचार सुरू आहे. पण त्यांनी नगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढू तर जिल्हा परिषदेला आघाडी संदर्भात चर्चा करू, असे सांगितले असल्यचो वृत्त आहे.

त्यामुळे माजी खा. संजयकाका पाटील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आघाडीबरोबर असतील, असे बोलले जात आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाला देखील महाविकास आघाडीबरोबर घेतले जाणार आहे. तशी चर्चा त्यांच्या नेत्यांची देखील होणार आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांना देखील बरोबर घेण्याबाबत चर्चा होणार आहे.

खा. विशाल पाटील व संजयकाकांचे जुळणार का?

भाजपविरोधात महाविकास आघाडी व समविचारी पक्षाच्या नेत्यांना एकत्रित करण्यासाठी आ. जयंत पाटील व आ. विश्वजीत कदम प्रयत्न करत आहेत. यामध्ये माजी खा. संजयकाका पाटील यांना देखील घेतले जात आहे. काका जर आघाडीत आले तर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात असलेल्या समर्थकांसाठी ते उमेदवारी मागू शकतात, पण याला खा. विशाल पाटील विरोध दर्शविणार. खासदारांना ज्यांनी लोकसभेला मदत केली, त्यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही असतील. यावरून खा. विशाल पाटील व संजयकाकांचे जुळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *