rbl bank news : सांगलीची आरबीएल बँक आता दुबईच्या शेखच्या ताब्यात

SHARE:

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

rbl bank news : सांगलीची आरबीएल बँक आता दुबईच्या शेखच्या ताब्यात: संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आरबीएल बँक आता दुबईच्या एमिरातस् एनबीडी बँकेने ताब्यात घेतली आहे. बँकेचे 90 कोटी 80 लाख शेअर्स प्रत्येकी 280 रूपयाने म्हणजे 26853 कोटी रूपयांचे शेअर्स एमिरातस् बँकेने घेतले आहेत. त्यामुळे बँकेची 60 टक्के हिस्सेदारी आता दुबईच्या शेखच्या ताब्यात गेले आहे. चारच दिवसापूर्वी सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आले. नुकतेच या महत्वपूर्ण प्राथमिक भागभांडवल विक्रीला नियामक फाईलिंगद्वारे मंजुरी दिली आहे.

rbl bank news : सांगलीची आरबीएल बँक आता दुबईच्या शेखच्या ताब्यात

या निर्णयामुळे सर्वत्र खळबळ माजली असून, याचा सर्वात मोठा परिणाम भागधारकांवर होणार आहे. या करारानंतर भागधारकांचा फायदा होणार की तोटा होणार हे येणारा काळच ठरवेल. असे असले तरी या निर्णयाने शेअर्सचे भाव सहा टक्क्याने वाढले आहेत.
10 रूपये किंमत असणारे शेअर्स एकेकाळी 850 वर गेले होते. परंतु सध्या त्याची पातळी 320 च्या आसपास आहे. मिरज तालुक्यातील समडोळी या छोट्या पण तेजस्वी गावातून 1943 साली उगवलेली रत्नाकर बँक – आजच्या घडीला दुबईच्या एमिरात एन बीडी बँकेच्या मालकीखाली गेली आहे. एकेकाळी गावाच्या मातीत रुजलेली ही संस्था, आज शेखच्या तिजोरीत विलीन झाली, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

ही आहे समडोळीच्या तेजोमय इतिहासाची साक्षीदार संस्था, जिच्या स्थापनेने एका गावाने जागतिक अर्थविश्वात आपला ठसा उमटवला – आणि आज त्या ठशावर परदेशी ठिगळ बसले आहे!

आता दुबईच्या एमिरातस् एनबीडी या विशाल बँकिंग संस्थेने आरबीएल बँकेत तब्बल 26 हजार 823 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारानुसार 95 कोटी 90 लाख शेअर्स म्हणजेच 60% मालकी दुबईच्या शेखकडे जाणार आहे. हा व्यवहार भारतातील सर्वात मोठा परदेशी बँकिंग करार ठरला आहे –

हा मोठा व्यवहार बाजारातील नियमानुसार एमिरेटस् एनबीडीला आरबीएल बँकेच्या भागधारकांसाठी देखील बंधनकारक ठरणार आहे. दरम्यान एमिरेतस् बँक आरबीएल बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनात कोणताही बदल करणार नाही. बँकेचे बहुतांश व्यवस्थापन सदस्य यांच्या भूमिकांमध्ये कायम राहितील आणि नव्या मालकाच्या इनपूटसह बँकेचे धोरणात्मक निर्णय घेतले जातील.

‘रत्नाकर’चा जन्म – समडोळीच्या मातीतून

सन 1943, भारत स्वातंत्र्याच्या स्वप्नांनी झगडत होता. आणि त्याच काळात समडोळीतील दूरदृष्टी असलेले, प्रखर बुद्धिमान बाबगोंडा भुजगोंडा पाटील यांनी एका स्वप्नाला वास्तवात उतरवले -‘रत्नाकर बँक लिमिटेड’ या बँकेची स्थापना केली.
12 डिसेंबर 1888 रोजी जन्मलेले बाबगोंडा पाटील हे समडोळीचे तेजस्वी रत्न होते.प्राथमिक शिक्षण गावात, तर पुढील शिक्षण सांगली, कोल्हापूर आणि मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये पूर्ण केले. स्कॉलरशिप परीक्षेत पहिले क्रमांक मिळवणारा हा तेजस्वी विद्यार्थी नंतर सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत शिक्षण आणि समाजकार्याच्या वाटेवर चालू लागला. 1922 ते 1946 या काळात त्यांनी दक्षिण भारत जैन सभा या प्रतिष्ठित संस्थेची धुरा वाहिली.

सांगली संस्थानच्या रयत असेम्ब्लीमध्ये प्रथम अर्थमंत्री, नंतर विकास मंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. आणि त्या सर्व अनुभवांच्या शिदोरीवरून त्यांनी निर्माण केली – समडोळीची रत्नाकर बँक, जी पुढे पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थजगतात एक विश्वासार्ह नाव ठरली.14 जून 1943 रोजी रत्नाकर बँकेस अधिकृत मान्यता मिळाली. सुरुवातीची तेरा वर्षे बाबगोंडा पाटील स्वतः अध्यक्षपदावर राहिले. 1969 मध्ये बँकेला ‘शेड्युल्ड बँक’चा दर्जा मिळाला,1970 मध्ये बँकिंग परवाना.

‘रत्नाकर’ ते ‘आरबीएल’ – नाव बदलले, आत्मा हरवला

2010 च्या दशकात खाजगीकरणाच्या वार्‍यांनी सर्व दिशा गाजवल्या. त्याच काळात विश्ववीर आहुजा यांच्या नेतृत्वाखाली रत्नाकर बँकेचा ताबा नव्या हातात गेला, आणि बँकेचे नाव बदलून आरबीएल बँक लि. झाले.

या कराराने समडोळीच्या भावनांवर जणू शिक्कामोर्तब

ज्यांनी आपल्या गावातील छोट्या दालनातून ही बँक उभी केली, त्यांचे नाव आता केवळ ‘इतिहासाच्या फाईलमध्ये’ उरले आहे. ‘रत्नाकर’चा आत्मा हरवला, पण आठवणी अमर समडोळीच्या मातीचा हा रत्नाकर आता दुबईच्या वाळवंटात झळकतोय. गावकर्‍यांना अभिमान आणि वेदना – दोन्हीची जाणवणारी ही वेळ आहे. बाबगोंडा पाटीलांनी रुजवलेले बी आज विशाल वृक्ष बनले, पण त्या वृक्षाची मुळे आता परकीय जमिनीत रोवली गेली आहेत. एके काळी गावातून उगवलेली बँक देशाला दिशा देईल. असं म्हणणार्‍या समडोळीकरांसाठी ही बातमी म्हणजे धक्काच.

1943 साली एका गावकर्‍याच्या बुद्धी, दूरदृष्टी आणि परिश्रमातून जन्मलेली बँक आज 2025 मध्ये अरब शेखच्या घशात गेली आहे. बाबगोंडा पाटील, समडोळी आणि रत्नाकर ही तीन नावं इतिहासात कायम कोरली जातील, पण त्या नावांचा स्वामित्वाचा हक्क मात्र आता आपल्या हाती राहिला नाही. रत्नाकर बँकेचं रुपांतर जागतिक बँकेत झालं, पण तिच्या पायवाटा मात्र अजूनही समडोळीच्या मातीतूनच सुगंध देतात!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *