miraj child story : मिरजेतील टोळीने अपहरत बाळ विकले रत्नागिरीत

SHARE:

miraj child story : मिरजेतील टोळीने अपहरत बाळ विकले रत्नागिरीत : शहरातील विश्रामबाग चौकातून फुगे विक्री करणार्‍या एका राजस्थानच्या कुटुंबातील 1 वर्षांचे गोंडस बाळ चार दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री पळवले होते. याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना तब्बल 72 तासानंतर त्या अपहरण झालेल्या बाळाची सुखरूप सुटका केली. बाळ प्रकरणी मिरजेतील सराईत गुन्हेगाराची टोळी उघडकीस आली असून पैशांसाठी बाळ चोरून रत्नागिरी मधील दांपत्याला विकल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

miraj child story : मिरजेतील टोळीने अपहरत बाळ विकले रत्नागिरीत

72 तासांच्या थरारानंतर बालकाची सुटका : : पोलिसांच्या प्रयत्नांनी आईच्या खुशीत बाळ सुखरूप

या प्रकरणी इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय 43 रा. किल्लाभाग, मिरज) याला अटक केली आहे. तर टोळीतील सराईत गुन्हेगार इम्तियाज पठाण आणि त्याची पत्नी वसिमा पठाण हे दोघे पसार झाले आहेत. दीपावलीच्या पहिल्या दिवशी अपहरण करण्यात आलेला चिमुकला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केलेल्या अथक प्रयत्नामुळे दीपावलीच्या अखेरच्या दिवशी अखेर सुखरुप सापडला. कोणतेही ठोस धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक माहिती आणि खबर्‍यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते या चिमुरड्याला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कनवास येथे राहणारे विक्रम बागरी हे कुटुंबासह उदरनिर्वाहसाठी सांगलीत आले होते. त्यांना एक मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे. दररोज सकाळी ते आणि त्यांची पत्नी विश्रामबाग चौकात चरितार्थासाठी फुगे विकायचे. त्यातून जे पैसे मिळत त्यातून त्यांचा रोजचा दिवस बाहेर पडायचा. निश्चित ठावठिकाणा कोठेनसल्याने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे कुटुंब विश्रामबाग चौकातील दुभाजकावरच झोपायचे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कुटुंबासह झोपले होते.

लहानगा एक वर्षाचा चिमुकला आईच्या कुशीत होता मात्र पहाटेच्या सुमारास चिमुकला गायब झाला होता. चोरट्यांनी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास चिमुकल्याचे अपहरण केले. ही बाब लक्षात येताच आईने हंबरडा फोडला. चिमुकल्याच्या वडिलांसह कुटुंबानेच तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांचे पथक लगेचच चिमुकल्याच्या शोधार्थ रवाना करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणची स्वतंत्र पथकेही जिल्ह्याच्या बाहेर पाठविण्यात आली.

शहरातील अनेक सीसीटिव्ही बंद अवस्थेत असल्यामुळे पोलिसांच्या तपासकामात अडथळा येत होता. परंतु गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज पवार यांच्या पथकातील संदिप नलावडे आणि अमीरशा फकीर यांना खबर्‍या आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण करण्याचा टोळीचा सुगावा लागला. संशयित इनायत गोलंदाज, इम्तीयाज पठाण आणि वसीमा पठाण या तिघांनी सदर चिमुकल्याचे अपहरण केल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.

पोलिसांनी वेळ न दवडता तातडीने मिरजेतून इनायत गोलंदाज याचा ठावठिकाणा काढून त्यास ताब्यात घेतले. पंकज पवार यांनी संशयित गोलंदाज याकडे केलेल्या चौकशीत, तिघांनी मिळून अपहरण केलेल्या चिमुकल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे विक्री केल्याचा प्रकार समोर आला. सावर्डे येथील सचिन राजेशिर्के यांना मूलबाळ नसल्याची माहिती संशयित वसीमा हिला मिळाली होती. तिने त्यांच्याशी परिचय वाढवून त्यांना मुलगा देण्याचे आश्वासन दिले आणि राजेशिर्के यांच्याकडून पैसे उकळले होते.

पोलीस चौकशीत ही माहिती निष्पन्न होताच पोलीस पथकाने थेट सावर्डे गाठले. तेथे राजेशिर्के यांच्याकडून सदर चिमुकल्यास ताब्यात घेण्यात आले.पोलीस पथक सांगलीत आल्यावर चिमुकल्याची वैद्यकीय तपासणी करुन पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी अपह्रत चिमुकल्यास आई – वडिलांच्या ताब्यात दिले. आपल्या मुलाला तीन दिवसानंतर सुखरुप पाहिल्यावर आई – वडिलांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू कित्येक वेळ थांबत नव्हते.

सदरची कारवाई पोलीस निरिक्षक सतीश शिंदे आणि सुधीर भालेराव, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार आणि चेतन माने, उपनिरिक्षक कुमार पाटील, पोलीस अंमलदार सपना गराडे, दरिबा बंडगर, अमर नरळे, सुनीता शेवाळे, सुशील म्हस्के, साधना ओमासे, मनिषा बजबळे, आर्यन देशिंगकर, अजय पाटील, अभिजीत पाटील आदींसह 26 पोलीस कर्मचार्‍यांनी केली.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बालक देण्याचे आमिष….

रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सचिन राजेशिर्के यांना मूलबाळ नव्हते. याची माहिती मिळताच तिघा संशयितांनी त्याला चिमुकला देवून राजेशिर्के यांच्याकडून पैसे उकळायचा प्लॅन रचला. त्यानुसार वसीमा हिच्या मदतीने इनायत गोलंदाज आणि इम्तीयाज पठाण याने राजेशिर्के यांना कायदेशीर प्रक्रिया करुन मुल आपणास मिळवून देतोे असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले.

ठरल्याप्रमाणे दीपावलीच्या पहिल्या दिवशी तिघा संशयितांनी चिमुकला त्यांच्या ताब्यात दिला. कायदेशील कागदपत्रांची पूर्तता दीपावलीनंतर करु असे संशयितांनी त्यांना सांगितले होते. तत्पूर्वीच पोलिसांनी या प्रकरण उघडकीस आणले.

दीपावलीच्या पहिल्या दिवशी नरकचतुर्दशीलाच तिघा संशयितांनी विश्रामबाग चौकातून पहाटेच्या सुमारास चिमुकल्याचे अपहरण केले होते. त्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सचिन राजेशिर्के यांच्या ताब्यात चिमुकल्यास देण्यात आले.

दोन्ही घटनांकरिता चोरट्यांनी दीपावलीचा मुहुर्त निवडला होता. मात्र पोलिसांनी दीपावलीच्या अखेरच्या दिवशी भाऊबीजेला चिमुकल्याचा ताबा घेवून त्याची सुखरुप सुटका केली. ज्यावेळी आईच्या ताब्यात चिमुकला देण्यात आला त्यावेळी तिचे आंनदाश्रू थांबत नव्हते

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *