samdoli news : समडोळी येथून ‘जी-राम-जी’ अभियानाचा भव्य शुभारंभ

SHARE:

samdoli news : समडोळी येथून ‘जी-राम-जी’ अभियानाचा भव्य शुभारंभ : समडोळी (ता. मिरज) – केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘जी-राम-जी अभियानाचा मिरज तालुक्यातील समडोळी येथून भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. समडोळी ग्रामपंचायतीसमोरील भव्य पटांगणात आयोजित विशेष ग्रामसभेत या अभियानाची औपचारिक सुरुवात झाली.

samdoli news : समडोळी येथून ‘जी-राम-जी’ अभियानाचा भव्य शुभारंभ

या कार्यक्रमास पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार हे प्रमुख उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुल कुंडवार यांनी ‘जी-राम-जी’ अभियानाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, जी-राम-जी म्हणजे सुशासन, महसूल, प्रशासन, व्यवस्थापन आणि तक्रार निवारण या पाच स्तंभांवर आधारित हे अभियान आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

ते पुढे म्हणाले, या अभियानांतर्गत ग्रामसभांचे नियमित आयोजन, निर्णयांची वेळेत अंमलबजावणी, सामाजिक लेखापरीक्षण आणि माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. घरकर, पाणीपट्टी यासारख्या करांची 100 टक्के वसुली, डिजिटल बिलिंग व ई-पेमेंटवर भर दिला जाणार आहे. सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांना प्रशिक्षण देऊन कायदे व योजनांची अचूक अंमलबजावणी केली जाईल.

निधीचे योग्य नियोजन करून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येईल. तसेच नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे. ऑनलाइन व नोंदणी-आधारित फॉलो-अपमुळे प्रशासन अधिक गतिमान होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, समडोळी ग्रामपंचायतीने यापूर्वीही विविध शासकीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गतही समडोळीचे नाव तालुक्यात अग्रक्रमावर असल्याने सर्व ग्रामस्थांना अभिमान वाटावा अशी ही बाब आहे, असे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नमूद केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सौ. सुनीता हजारे, वैभव पाटील, संजय बेले, दीपक मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत अधिकारी जेऊर यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गर्ल्स हायस्कूलच्या अर्चना चव्हाण मॅडम यांनी केले.

या विशेष ग्रामसभेस माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, उपसरपंच क्रांती पाटील, कृष्णात मसाले, प्रमोद ढोले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत लिपिक चंदकांत गर्जे, निलेश चव्हाण यांच्यासह सर्व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *