sangli bjp news : प्रदेशाध्यक्षांसमोरच भाजपमध्ये रणकंदन; आमदार संतापून बैठकीतून बाहेर

SHARE:

sangli bjp news : प्रदेशाध्यक्षांसमोरच भाजपमध्ये रणकंदन; आमदार संतापून बैठकीतून बाहेर : महापालिका निवडणुकीचे रण तापत असतानाच भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठा भडका उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईत उमेदवारी निश्चितीसाठी आयोजित बैठकीत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीतच नेत्यांमध्ये जोरदार जुंपली, तर संतप्त आमदार गाडगीळ यांनी थेट बैठक अर्धवट सोडत बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

sangli bjp news : प्रदेशाध्यक्षांसमोरच भाजपमध्ये रणकंदन; आमदार संतापून बैठकीतून बाहेर

महापालिका निवडणुकीआधी भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

विद्यमान उमेदवारांना डावलून आयात केलेल्या नेत्यांना सरसकट प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत जेष्ठ आमदारांनी बैठक सोडली, अशी जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

कोअर कमिटी बैठकीनंतर वादाला तोंड फुटले

भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाली. मात्र याच बैठकीत नवा-जुना, गट-तट आणि आयात विरुद्ध स्थानिक असा संघर्ष उघडपणे समोर आला.

जयश्रीताई-पृथ्वीराज गटावरून ठिणगी

काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या गटाला सात ते नऊ जागा देण्यावरून चर्चेला तोंड फुटले. पक्ष प्रवेशावेळी दिलेली आश्वासने पाळावीच लागतील, असे प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केल्याने जुने पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

नवीन आलेल्यांसाठी जागा राखीव असतील, तर वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणार्‍यांना न्याय कुठे? असा थेट सवाल जेष्ठ आमदारांनी उपस्थित केला. मात्र आपल्या समर्थकांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच आमदार गाडगीळांचा संताप अनावर झाला.

‘उमेदवारी द्या, नाहीतर स्वतंत्र लढू’

बैठकीदरम्यान काही नेत्यांनी थेट भूमिका घेत आमच्या प्रभागात आमच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, अन्यथा स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय नाही असा इशाराही दिल्याची जोरदार चर्चा आहे. पॅनेल ठरवताना स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही यावेळी उघडपणे करण्यात आला.

महिला नेत्याचा आत्मदहनाचा इशारा

या सगळ्या गदारोळात एका जेष्ठ महिला नेत्याने तर थेट आक्रमक भूमिका घेतली.
माझ्या प्रभागातून माझ्या मुलालाच उमेदवारी मिळाली पाहिजे. नव्याने आलेल्या तरुणाला उमेदवारी दिली तर मी प्रदेश कार्यालयासमोर आत्मदहन करीन असा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली.यानंतर वरिष्ठ नेत्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित महिला नेत्याची मनधरणी केल्याचे समजते.

बंडखोरीची भीती, यादी जाहीर करण्यास विलंब

या सार्‍या घडामोडींमुळे भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता प्रचंड वाढली आहे. नाराज नेते विरोधकांच्या गळाला लागू नयेत, यासाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचे चित्र आहे.

तरीही काही प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित झाले असून कामाला लागा असे तोंडी आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकीआधीच भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाल्याने पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता उमेदवारी जाहीर करताना हा असंतोष कितपत आवरता येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *