sangli halad news :सांगलीची हळदपेठ देशात नाही तर जगात भारी : सांगलीची ओळख सांगायची झाली, तर केवळ जिल्हा म्हणून नव्हे तर सुवर्णासारख्या झळाळणार्या हळदीच्या दरवळाने नटलेल्या भूमी म्हणून करावी लागेल. पिवळीधम्मक, सुवासिक, औषधी गुणांनी नटलेली हळद म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते एकच नाव – सांगली!
sangli halad news :सांगलीची हळदपेठ देशात नाही तर जगात भारी
ही फक्त हळदपेठ नाही ही परंपरेची, विश्वासाची आणि व्यापारातील प्रामाणिकतेची जपलेली गाथा आहे. शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत घेऊन उभी असलेली सांगलीची हळदपेठ आजही अभिमानाने सांगते – एकेकाळी जगातले हळदीचे दर आम्ही ठरवत होतो!
इथल्या मातीला जणू सोन्याचा स्पर्श लाभला आहे. कारण इथे उगवणारी राजापुरी हळद ही केवळ मसाला नसून औषधी गुणांनी भरलेली अमूल्य देणगी आहे.
सांगलीच्या शेतकर्यांच्या कष्टातून जन्माला येणारी ही हळद, देशभरच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडते.
सांगलीच्या व्यापार्यांची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे. 1910 साली काही दूरदृष्टी असलेल्या व्यापार्यांनी एकत्र येऊन हळदीचा वायदे बाजार सुरू केला. ना कोणती संस्था, ना कायद्याचा बंधनकारक चौकट फक्त एकमेकांवर असलेला विश्वास! शब्द दिला म्हणजे तो पाळायचाच – हीच त्यांची ओळख.
नंतर स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये कायद्याचं कवच मिळालं आणि 1953 मध्ये ‘द स्पायसेस अँड ऑईल सीड्स एक्स्चेंज लिमिटेड’ची स्थापना झाली. सांगलीचा हळद व्यापार अधिक संघटित झाला, अधिक सक्षम झाला आणि देशात नंबर वन बनला!
आज सांगलीच्या मार्केट यार्डात वर्षाला 17-18 लाख क्विंटल हळदीची आवक होते, आणि हजारो कोटींची उलाढाल घडते. हा फक्त व्यापार नाही तर हजारो कुटुंबांच्या जगण्याचा आधार आहे. 60-70 अडते, तितकेच व्यापारी, हजारो हमाल, निर्यातदार आणि त्यांच्या श्रमातून उभी राहिलेली एक भक्कम अर्थव्यवस्था!
देशाच्या कानाकोपर्यातून हळद सांगलीकडे येते – आंध्रप्रदेशातील कडाप्पा, तेलंगणातील निजामाबाद, तामिळनाडूतील इरोड-सालेम, कर्नाटकातील बेळगाव-विजापूर पण भाव मात्र ठरतो सांगलीत! हीच सांगलीच्या बाजाराची ताकद आहे.
सांगलीच्या बाजारात लिलावाची एक वेगळीच रंगत असते. व्यापार्यांचे आवाज, सौद्यांची चढाओढ, आणि क्षणात होणारे व्यवहार सगळं काही जणू एखाद्या उत्सवासारखं! आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असते – प्रामाणिकता. तात्काळ बिल, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासाची नाळ – यामुळेच सांगलीचा हळद व्यापार आजही भक्कम उभा आहे.
राजापुरी हळदीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा दर्जा. सांगलीच्या 150-200 किलोमीटर परिसरातील माती, हवामान आणि पाणी – या सगळ्यांचा मिळून तयार झालेला हा अनमोल वारसा आहे. पूर्वी ही हळद राजापूर बंदरातून निर्यात होत असे, म्हणूनच तिला राजापुरी हे नाव मिळालं.
हळद हे केवळ पीक नाही तर नऊ महिन्यांची साधना आहे. जमिनीखाली वाढणारे गड्डे, वर कर्दळीसारखी डोलणारी पानं आणि शेतकर्यांच्या घामाने फुललेलं पीक. एप्रिलमध्ये लागवड आणि डिसेंबरमध्ये काढणी – या प्रवासात शेतकरी आणि निसर्ग यांचं एक अद्भुत नातं तयार होतं.
आजही सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील शेतकरी हळद लागवडीकडे आकर्षित होत आहेत. कारण ही फक्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर जमिनीचा पोतही सुधारते. म्हणजेच हळद ही शेतकर्यांसाठी सोन्याची शेती ठरते.
सांगलीची हळदपेठ म्हणजे केवळ बाजार नाही
ती आहे परंपरेचा अभिमान, श्रमांचा सन्मान आणि विश्वासाची ओळख!
आणि म्हणूनच –
सांगलीची हळदपेठ देशात नव्हे तर जगात भारी!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











