SANGLI LOKSABHA : मुहूर्तालाच महाविकास आघाडीत बिघाडी

SHARE:

 

अमृत चौगुले, जनप्रवास : सांगली
SANGLI LOKSABHA : मुहूर्तालाच महाविकास आघाडीत बिघाडी महायुतीचा पाडाव अंतर्गत सांगलीतही मोर्चेबांधणी करणार्‍या महाविकास आघाडीच्या सांगलीतील मुहूर्तसभेलाच बिघाडीचा खोडा लागल्याचे स्पष्ट झाले. या मेळाव्यात नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह वक्त्यांनी विरोधक विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर काहीच वक्तव्य केले नाही. उलट आघाडीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांची उमेदवारी हा टीकेचा विषय ठरला. सभेकडे काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांनी बहिष्कारच टाकला. दुसरीकडे ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीतूनही एकास एक लढत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तुल्यबळ ताकद पाहता काँग्रेसला चाल द्यावी, असा सूर दोघांनीही काढत नेत्यांकडे कळविले आहे. यातून कोणाची माघार होणार की विरोधक दोघेही मैदानात हे काळ ठरवेल. पण ही बिघाडी मात्र भाजपच्या पथ्थ्यावर पडेल अशीच चिन्हे आहेत.

SANGLI LOKSABHA : मुहूर्तालाच महाविकास आघाडीत बिघाडी

सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीअंतर्गत भाजपचे खासदार संजयकाका पाटील विरुद्ध विशाल काँग्रेसचे पाटील अशी लढत होईल अशी चिन्हे होती. परंतु संजयकाकांना तिसर्‍यांदा उमेदवारी निश्चित झाली. पण अचानक जागावाटपात पुन्हा काँग्रेसची सांगलीची उमेदवारी गेली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जागा गेली आणि पहिल्याच फेरीत पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. अर्थात आघाडीतून जागाबदल करून विशाल पाटील यांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्यासह दोन्ही जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांनी आजही ताकद पणाला लावली आहे. पण अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

दुसरीकडे विशाल पाटील यांनी आता प्रसंगी अपक्ष म्हणून बंडाचा झेंडा उगारत अर्जही दाखल केला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीअंतर्गत बंडखोरीमुळे सांगली राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. परिणामी चंद्रहार यांनी आपल्यापद्धतीने प्रचार सुरू केला आहे, त्यासाठी नेते खासदार संजय राऊत यांनी तीन दिवस सांगलीत ठाण बांधून मनोमिलनासाठीही प्रयत्न केले. पण तोडगा निघाला नाही. दुसरीकडे विशाल पाटील यांनीही संपर्कासह मोर्चेबांधणी सुरूच ठेवली आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रचाराचा म्हणजेच चंद्रहार यांच्या सभेचा मुहूर्त काढण्यात आला.

भाजपला हरविण्याची भाषा करणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यानिमित्ताने एकत्र येणे अपेक्षित होते. परंतु ठरल्याप्रमाणे काँग्रेसने या सभेला दांडीच मारली. शिवसेना आणि राष्टवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मात्र मेळाव्यास हजेरी लावली. यातील राष्ट्रवादीकडून स्वत: जयंत पाटील, आमदार अरुणअण्णा लाड आ. सुमनताई पाटील यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तुलनेत ठाकरे सेनेची ताकद कमी आहे. याचा विचार करूनच नाट्यगृहात मर्यादित स्वरूपातच मेळावा घेण्यात आला.

अर्थात भाजपला टक्कर देण्याची भाषा करताना भाजपच्या बूथ किंवा कार्यकर्त्यांची बैठकही यापेक्षा मोठ्या संख्येने होते हे या मेळाव्यातील गर्दीने जाणवून आले. या मेळाव्यात भाजप आणि विशेषत: खासदार संजयकाका पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली जाईल अशी चर्चा होती. परंतु मेळाव्यात जयंत पाटील यांच्यासह चंद्रहार पाटील किंवा कोणीच यांच्यावर काहीच टीका केली नाही. अगदी भाजपअंतर्गत नाराजी, गटबाजी आणि माजी आमदार विलासराव जगताप यांचा राजिनामा हे महाविकास आघाडीला पूरक होऊ शकते, यावर एकही चकार शब्द कोणी काढला नाही.

जयंत पाटील यांनी भाजपच्या देशातील आणि राज्यातील कारभारावर टीका करीत महाविकास आघाडीच्या विजयाचे आवाहन केले.

सोबतच बिघाडी होऊ नये, सोबतच्या पक्षावर टीका करू नये अशा संयमाच्या सूचना त्यांनी दिल्या. मेळाव्यात चंद्रहार यांनी विशाल पाटील यांना उद्देशून मी घराणेशाही आणि साखरसम्राट असल्याची टीका केलीच. शिवाय शेतकरीपुत्र खासदार चालत नसेल तर प्रसंगी माझी अडचण झाल्यास उमेदवारी माघारीची भाषा केली. एकीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रिय प्रचारात नसल्याचे आणि नेत्यांकडे उमेदवारीसाठी परस्पर माघारीची भाषा करीत असल्याचेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे तेही संभ्रमात असल्याचे स्पष्ट होते.

आता चंद्रहार यांच्या सभेत जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आघाडीधर्म पाळून जरी राष्ट्रवादीचे नेते अरुणअण्णा लाड, सुमनताई पाटील आले तरी त्यांचे किती पाठबळ मिळेल याचीही शंका त्यांनाही आहे. कारण वसंतदादा घराणे विशाल पाटील यांच्याशी ऋणानुबंध आणि परंपरागत भाजप विरोधक यांना मतविभागणीतून फायदा होऊ नये याची खबरदारीही ते नेते त्यांच्या मतदारसंघात घेणार हे उघड आहे. परिणामी भाजप आणि सेनेपेक्षा विशाल पाटील यांनाही मदत करणार का आघाडीधर्म पाळणार हे काळ ठरवेल. पण आता विशाल पाटील मैदानात उतरल्याने मुहूर्तालाच बिघाडी झाली आणि तिरंगी लढत राहिल्यास मतविभागणी होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याचा फायदा संजयकाकांना होणार हे स्पष्ट आहे.

प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे… डाव प्रतिडाव निरनिराळे…!

अधिकृत काँग्रेस आणि विशेषत: महाविकास आघाडीतून विशाल पाटील यांची उमेदवारी कापण्याचे खापर जयंत पाटील यांच्यावर फोडले जात आहे. त्याला इतिहासातील वसंतदादा-राजारामबापू किनार असल्याची टीका होते. त्याला खुद्द जयंत पाटील यांनीच उत्तर दिले. या वादाच्या इतिहासावर नव्हे तर कामावर भविष्य ठरते, असा टोला त्यांनी विशाल पाटील यांना लगावला. अर्थात नाही म्हटले तर जुना कार्यकर्ता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांचाही हात आहे हे उघड चर्चेत आहे. दुसरीकडे आजच्या मेळाव्यात महाविकास आघाडीतील खदखद ही भाजपला पूरक ठरणार हे उघड आहे. दुसरीकडे विशाल पाटील यांच्या बंडखोरीला भाजप व महायुतीअंतर्गत घटक पक्षांकडून बळ दिले जात आहे हे लपून राहिलेले नाही. त्यातलाच भाग आता संजयकाकांवर तोफ डागत विलासराव जगताप यांनी विशाल यांना खुलेआम पाठिंबा दिला. पुढे आणखी काही घडामोडी सुरूच आहेत. एकूणच अपापल्या हेतूने प्रत्येकाचे या निवडणुकीतून डाव-प्रतिडाव टाकत पट काढण्याचे खेळ सुरू आहेत. यातूनच कोणाच्या पारड्यात किती बळ आणि त्यातून खासदार ठरेल.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *