sangli news : खासदार अपक्ष पण डीएनए काँग्रेसचाच : आ. जयंत पाटील : महापालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासह महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. येत्या चार दिवसात जागा वाटपाच्या चर्चा देखील सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.
sangli news : खासदार अपक्ष पण डीएनए काँग्रेसचाच : आ. जयंत पाटील
महापालिकेची निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढणार
आ. जयंत पाटील , आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांची घोषणा
महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील व आ. विश्वजीत कदम यांची बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीची घोषणा केली. आ. जयंत पाटील म्हणाले, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल प्रलंबित असताना महापालिका निवडणुकीची घोषणा केली जात आहे.
सध्या नागरिकांमध्ये ईव्हीएमबाबत संशय व्यक्त होत आहे. नगरपालिकेत झाले तसेच महापालिकेत होऊ नये. ज्या दिवशी मतदान होईल त्याच्या दुसर्या दिवशी मनपाची मतमोजणी घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी केली जाणार आहे. तसा निर्णय देखील झाला आहे. लवकरच घटक पक्षांचे स्थानिक प्रमुख पदाधिकार्यांमध्ये चर्चा होईल, त्यानंतर जागा वाटपचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
भाजपने सांगली महापालिकेला विकासापासून मागे ठेवले. इतर शहरांचा विकास झाला पण सांगलीचा विकास झाला नाही. शहरात अनेक समस्या आहेत. या समस्या घेऊन आम्ही निवडणुकीसाठी उतरणार आहे. नक्कीच महाविकास आघाडीला यश येईल, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
खा. विशाल पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी अद्याप जाहीर झाली नाही, तरी देखील निवडणुकीचा कार्यक्रम लावला आहे. यामागे गौडबंगाल काय आहे? असा सवाल केला. महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट), वंचित आघाडी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली जाणार आहे. गेल्या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही पण भाजप उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत काँग्रेसला 50 हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. अनेकांनी पक्ष सोडले पण जनता आमच्याबरोबर आहे. भाजपविरोधात नाराजी आहे.
महापूर उपाययोजनांसाठी 600 कोटींचा निधी आणल्याचे सांगितले जात आहे. पण यातून महापूर उपायोजना होणार नाहीत. केवळ नाले व मोठ्या गटारी बांधल्या जाणार आहेत. हा प्रकल्प अहवाल करताना लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेतले नाही. गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली होती. पण केवळ 15 कोटींचा निधी दिला. भाजपकडून ही फसवणूक झाली आहे. वारणा योजनेचे देखील तेच आहे. भाजपची मंडळी फक्त मतांसाठी घोषणा करत असल्याचा आरोप खा. विशाल पाटील यांनी केला.
आ. विश्वजीत कदम म्हणाले, महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. महापालिका क्षेत्रात काँग्रेस एकसंघ आहे. कॉँग्रेस विखुरलेली नाही. पूर्वीपेक्षा ताकदीने काम करणार आहोत. येत्या दोन दिवसात शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड जाहीर होईल. सांगलीत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपमध्ये अनेक जण गेले, उमेदवारी मिळेल म्हणून अनेकजण गेले पण आजच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत कोणाला कुठे स्थान मिळाले हे जनतेला कळाले असल्याचा टोला आ. कदम यांनी लगाविला.
खासदार अपक्ष पण डीएनए काँग्रेसचाच…
खा. विशाल पाटील हे अपक्ष आहेत पण त्यांचा डीएनए काँग्रेसचा आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना मदत केली आहे, त्यामुळे खात्री आहे ते महाविकास आघाडीसोबत राहतील आणि नेतृत्व करतील असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तर खा. विशाल पाटील म्हणाले, मी काँग्रेसचाच आहे. निवडून आल्यानंतर दुसर्या दिवशी काँग्रेसला पाठिंबा दिला. मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. जर भाजप नेते मला बोलावत असतील तर मी चांगले काम करतो हे प्रशंसापर असल्याचे त्यांच्याकडून दिसून येते.
नाभिक समाजाची आ. जयंत पाटलांकडून दिलगिरी…
पोलीस दलाने एका गुन्हेगाराचा शोध पंधरा दिवस झाला तरी घेतला नाही. त्यामुळे विधीमंडळ अधिवेशनावेळी बोलण्याच्या ओघात काही हजामत असा शब्द बोललो ती चूक घडली आहे, त्याबद्दल संपूर्ण नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करत असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











