sangli political news : इद्रिस नायकवडी, सुहास बाबर यांना मिळणार मंत्रीपदाचा दर्जा : विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याने महायुतीला आठ पैकी पाच आमदार दिले. पण मंत्रीपदापासून जिल्ह्याला वंचित राहावे लागते. आता मंत्रीपदाची पोकळी दूर करण्यासाठी महायुती सरकारमध्ये आ. इद्रिस नायकवडी व आ. सुहास बाबर यांना मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला आहे. आ. नायकवडी यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे तर आ. बाबर यांना महाराष्ट्र राज्य उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळणार असल्याच्या घडामोडी मुंबईत सुरू आहेत.
sangli political news : इद्रिस नायकवडी, सुहास बाबर यांना मिळणार मंत्रीपदाचा दर्जा
जिल्ह्याला अखेर मिळणार न्याय; लवकरच महामंडळांचा विस्तार
लोकसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे आठ पैकी पाच आमदार निवडून आले. त्यामध्ये भाजपचे चार व शिवसेनेच्या एका आमदाराचा समावेश आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारपदाची माळ घातली. यापूर्वी आ. सदाभाऊ खोत यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे सात आमदार झाले आहेत. पण यामध्ये एकालाही मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे पालकमंत्रीपद हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे गेले. जिल्ह्यावर मंत्रीपदाबाबत अन्याय झाल्याचे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बोलले जात होते. मात्र आता हा अन्याय दूर होणार असल्याचे चित्र आहे.
महायुतीच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रिक्त असलेल्या महामंडळांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
भविष्यात होणार्या निवडणुकीत याचा फायदा होईल, अशी गणिते आखली आहेत. या महामंडळाच्या अध्यक्षपदावर लोकप्रतिनिधींची नेमणूक होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील दोन आमदारांना महामंडळाच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आ. सुहास बाबर यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चांगले संबंध आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळणार आहे. शिवसेनेचा याबाबतचा निर्णय झालेला आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महामंडळाच्या यादीत आ. इद्रिस नायकवडी यांचे नाव असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडे आ. नायकवडी यांच्या रूपाने एक चांगला मुस्लिम चेहरा आहे. त्यांच्याकडे सध्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. त्यांनी राज्यात सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहिल्यानगर, जालना, बीड, नाशिक, परभणी आदी भागात दौरे सुरू केले आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुस्लिम चेहरा म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्षपद मिळणार असल्याचे कळते. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपदाचा दर्जा असलेली दोन महामंडळांची अध्यक्षपदे मिळणार असल्याने जिल्ह्याचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपणार आहे.
sangli-political-news-idris-nayakwadi-suhas-babar-will-get-ministerial-status
जूनमध्ये होणार महामंडळांच्या नियुक्त्या…
राज्यातील अनेक महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या बाकी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे पक्षाला फायदा होण्यासाठी महायुतीकडून जातीची समीकरणे मांडली जात आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांना महामंडळे देण्यात येणार आहेत. रिक्त असलेल्या महामंडळाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत. जून महिन्यामध्ये या नियुक्त्या होणार असल्याचे बोलले जात आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











