sangli political news :बालेकिल्ला गमविणार्‍या काँग्रेस तालुकाध्यक्षांची उचलबांगडी होणार

SHARE:

sangli political news :बालेकिल्ला गमविणार्‍या काँग्रेस तालुकाध्यक्षांची उचलबांगडी होणार : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अकार्यक्षम पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा निरीक्षकांकडून यादी देखील मागितली आहे. सांगली जिल्ह्यातील अकार्यक्षम तालुकाध्यक्षांची उचलबांगडी होणार आहे. यामध्ये काँग्रेसचे बालेकिल्ले गमविणार्‍या काही तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. निवडणुकीपूर्वी नव्या दमाच्या कार्यकर्त्याला तालुकाध्यक्षपदाची काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.

sangli political news :बालेकिल्ला गमविणार्‍या काँग्रेस तालुकाध्यक्षांची उचलबांगडी होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नवे पदाधिकारी

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले, पण हे यश विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसला टिकवता आले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला. पश्चिम महाराष्ट्रात पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातून आ. विश्वजीत कदम हे एकमेव काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. इतर सर्व जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. राज्यात देखील तीच परिस्थिती आहे. आता नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस मजबुतीचा विडा उचलला आहे. राज्यभरात त्यांचे दौरे देखील सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी झालेल्या दौर्‍यानंतर काही पदाधिकारी हे केवळ पदावर ठाण मांडून बसले आहेत. त्यांना वरिष्ठांचे अभय आहे. पण पक्ष वाढीसाठी त्यांचे योगदान नसल्याचे पुढे आले आहे.

त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एका निरिक्षकांची नेमणूक करून शहर व जिल्हास्तराचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यासाठी निरिक्षक म्हणून माजी आमदार रामहरी रूपनवर सांगलीत आले होते. त्यांनी तालुकास्तरीय मेळावा घेऊन पदाधिकार्‍यांकडून आढावा देखील घेतला होता. सांगली व मिरज शहर महापालिका क्षेत्राचा आढावा देखील घेतला होता. मिरजेमध्ये झालेल्या बैठकीत जोरदार राडा देखील झाला होता. खा. विशाल पाटील गटाच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रण दिले नसल्याने बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना जाब विचारण्यात आला होता. पण हेच पदाधिकारी काँग्रेस विरोधी काम करत होते. यावरून बैठक वादळी ठरली होती. त्यानंतर पक्ष निरीक्षक रामहरी रूपनवर यांनी सर्व घडामोडींचा सविस्तर अहवाल तयार करून प्रदेशाध्यक्षकांकडे सुपूर्त केला आहे.

मिरज तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

अनेक वर्षांपासून या तालुक्यातून जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्वात जास्त सदस्य हे काँग्रेस पक्षाचे निवडून येत होते. नगरपालिका व महापालिकेत देखील काँग्रेस पक्षाचे जादा सदस्य असायचे. पण गेल्या सात वर्षांपासून ही परिस्थिती बदलली असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. स्थानिक पदाधिकारी अकार्यक्षम व गेल्या अनेक वर्षांपासून पदावर ठाण मांडून बसल्याने पक्ष वाढ खुंटली आहे. पक्षात असलेल्या दोन गटात केवळ राजकारण सुरू आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त होत आहेत. या तालुक्याबरोबर जिल्ह्यातील आणखी दोन ते तीन तालुक्यात पक्षाची ही परिस्थिती आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत.

चार महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील मिरज, पलूस, कडेगाव, जत, या तालुक्यातून जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून या पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जाणार आहे. या खालोखाल वाळवा, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, शिराळा व तासगाव तालुक्यात पक्षाकडून फिल्डिंग लावली जाणार आहे. पण यातील काही तालुकाध्यक्षांची गच्छंती होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नव्या दमाच्या कार्यकर्त्याला तालुकाध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. त्यासाठी प्रदेश कॉँग्रेसकडून येत्या काही दिवसामध्ये जिल्हा काँग्रेसला आदेश येणार आहेत. त्यानंतर नवीन काही तालुक्याध्यक्षांच्या निवडी होतील, अशी शक्यता आहे.

sangli-political-news-new-office-bearers-before-local-body-elections

गटबाजीत पक्षाच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष…

काँग्रेस पक्षामध्ये सध्या जोरदार गटबाजी सुरू आहे. लोकसभेला एकीचे दर्शन देणारी काँग्रेस विधानसभेला विस्कटली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. गटबाजी करणार्‍यांना पक्ष आता थारा देणार नाही. केवळ स्वत:च्या नेत्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे आणि पक्षाच्या कार्यक्रमांना गैरहजेरी लावणे, सत्ताधारी भाजप विरोधात करण्यात येणार्‍या आंदोलनाला दांडी मारणे, पक्षवाढीसाठी प्रयत्न न करणार्‍या पदाधिकार्‍यांना आता डच्चू मिळणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *