sangli rain news : जिल्ह्यातील 51 हजार हेक्टरवरील पीकं मातीमोल

SHARE:

sangli rain news : जिल्ह्यातील 51 हजार हेक्टरवरील पीकं मातीमोल : कधी नव्हे यंदा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाने जिल्ह्याची सरासरी ओलांडली आहे. ढगफुटीसदृश आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाचा तडाख्याने दुष्काळी तालुक्यातील 291 गावं बाधित झाली. जिल्ह्यातील 96 हजार 186 शेतकर्‍यांना फटका बसला असून तब्बल 51 हजार 387 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची माती झाली. कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक 22 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. डाळींब, ऊस, सोयाबीन, भूईमूग तसेच भाजीपाल्यासह इतर पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे नुकसानीत मोठी वाढ होऊन हाता-तोंडाशी आलेले पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले असून दसरा अन् दिवाळी कशी साजरी करायची, या चिंतेत बळीराजा आहे.

sangli rain news : जिल्ह्यातील 51 हजार हेक्टरवरील पीकं मातीमोल

291 गावं बाधित, 1 लाख शेतकर्‍यांना फटका, ऊस, डाळींब, सोयाबीन, भूईमूगाचे नुकसान

ऑगष्ट महिन्यात आलेला पूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कोलमडून पडला होता. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती, मात्र सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची हातातोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. ऑगष्टमध्ये पश्चिम भागातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते, त्यानंतर शनिवारी (दि. 27) रोजी एका दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे उर्वरित पिकांची माती झाली.

जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि जत या दुष्काळी पट्ट्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिरायत, बागायत आणि फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. 291 गावांतील 96 हजार 186 शेतकर्‍यांचे 53 हजार 387 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात वारणा आणि कृष्णा काठच्या तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला. परंतु सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्वदूर पावसाने उघडीप दिली होती. मात्र, अखेरीस दुष्काळी भागातील तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

पूर्व भागांत मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पिकांत पाणी उभेच साचून राहिल्याचे चित्र आहेत, त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान अजून वाढणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीने 291 गावांतील 22 हजार 337 हेक्टरवरील बागायत, 16 हजार 965 जिरायत, 12 हजार 84 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील 40 हजार 602 शेतकर्‍यांचे सर्वाधिक 22 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आटपाडी तालुक्यातील 20 हजार 122 शेतकर्‍यांचे 12 हजार 96 हेक्टरवरील, तासगाव तालुक्यातील 17 हजार 220 शेतकर्‍यांचे 8 हजार 860 हेक्टर, जत तालुक्यातील पंधरा शेतकर्‍यांचे 8 हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले, मात्र अप्पर संख तहसिल कार्यालय क्षेत्रातील 14 हजार 481 शेतकर्‍यांचे 7 हजार 619 हेक्टवरील नुकसान झाले.

मिरज तालुक्यातील 2 हजार 305 शेतकर्‍यांचे 1 हजार 529 हेक्टर, खानापूर तालुक्यात 715 शेतकर्‍यांचे 397 हेक्टर, वाळवा तालुक्यातील 143 शेतकर्‍यांचे 55.70 हेक्टर, आष्टा अप्पर तहसिल क्षेत्रातील 3.40 हेक्टर, तसेच शिराळा तालुक्यातील एक हेक्टरवरील पिके वाया गेली. डाळींब, द्राक्ष, ऊस, सोयाबीन, भूईमूग, मूग, उडीद, हळद, केळी या पिकांना सर्वाधिक नुकसान झाले.

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रशासनाकडून पाहणी करण्याचे काम सुरू आहे. कोणत्या भागात किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची माहिती कृषी विभागाकडूनही घेण्यात येत आहे.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु ः विवेक कुंभार

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 291 गावांतील 96 हजार 186 शेतकर्‍यांचे 53 हजार 387 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. अद्यापही नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होणार असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.

शेतीपिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये) 
क.महांकाळ 40,602 22000
आटपाडी 20,122 12096
तासगाव 17,220 8,860
जत 15004 7,964
मिरज 2,305 1,529
खानापूर 715 397
वाळवा 143 55.70
आष्टा अप्पर 11 3.40
शिराळा 26 1.0

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *